ठाणे : मराठी ब्रॅण्ड तयार करणे आणि तो व्यापक स्तरावर, एक्सलन्सीकडे नेणे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी विश्व मराठी संमेलन एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन जानेवारी २०२१ मध्ये होणा-या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे आयोजित ग्रंथयान या कार्यक्रमात डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, ‘विश्व मराठी संमेलन हे केवळ साहित्य संमेलन नाही, तर यात साहित्य, संस्कृती, उद्योजकता व युवा पिढी असे बहू आयाम आहेत. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत किंवा प्रबंधात बंदिस्त राहून चालणार नाही, तर समाजापर्यंत कसे पोहोचेल, त्याचा कसा फायदा होईल व त्याचा कसा वापर करता येईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. समाजात आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान, वैचारिक अशी विविध विषमता आहे. या सर्व स्तरांतील मराठीजनांना देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ या संमेलनात उपलब्ध होणार आहे.’
विश्व मराठी परिषदेचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी संमेलनाचा हेतू व आयोजन यासंबंधात विवेचन केले. ते म्हणाले, जगभरातील सुमारे १० लाख मराठी माणसे यात जोडली जातील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान, मुलाखतकार नरेंद्र बेडेकर यांनी मान्यवरांशी संवाद साधला.
मान्यवरांचे अनुभव युवकांना ऐकवले पाहिजेतजागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा २००२ पासून सांभाळणारे प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी त्या काळात भरवलेल्या संमेलनाचा अनुभवकथन करताना सांगितले, १९८९ मध्ये जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली. त्यामागे शरद पवार, मनोहर जोशी, माधव गडकरी ही मान्यवर मंडळी होती. काही वर्षे संमेलने झाली. नंतर, बंद पडली. २००२ मध्ये माझ्याकडे ही जबाबदारी आली. संमेलनात बोलणारे कोण असावेत आणि ऐकणारी कोण असावीत, हे मी प्रथम ठरवले. ज्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले व अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत कर्तृत्व गाजवले, अशांचे अनुभव इथल्या विद्यार्थी व युवकांना ऐकवले पाहिजे. त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, हे मी संमेलनाचे उद्दिष्ट ठरवले.