अंबरनाथ : ‘कोमसाप’च्या राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनात ‘राजकारणातील युवा आवाज’ या विषयावर शनिवारी झालेला परिसंवाद चांगलाच रंगला. या परिसंवादात युवकांनाही विधान परिषदेत नेतृत्व मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासोबत युवा मतदारसंघाची गरज या वेळी व्यक्त झाली. या मतदारसंघातून युवकांनाच उमेदवारी देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.युवा शक्ती संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘राजकारणातील युवा आवाज’ या विषयावर परिसंवाद झाला. शिक्षक मतदारसंघाप्रमाणे युवा मतदारसंघही असावा.ज्यामुळे युवकांना राजकारणात संधी मिळून युवकांसाठी मोठे काम करता येईल, असे मत चांदीबाई महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन आरेकर यांनी व्यक्त केले. राज्यपालांनी अध्यादेश काढूनही महाविद्यालयात निवडणुका होत नाहीत. यामुळे युवा नेतृत्वाचे एक प्रकारे नुकसान होत आहे. राजकारणाला व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. राजकारण करिअर घडविण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. मात्र केवळ पैसे मिळाले म्हणजे राजकारणात यशस्वी झाले असे नाही, तर आपल्यामुळे नागरिकांची कामे झाली तर त्याचे समाधान वेगळे असते, असे मत आरेकर यांनी व्यक्त केले.या परिसंवादात तरुणांनी राजकारणाकडे वळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. राजकारण वाईट आहे असे म्हणत गप्प बसण्याऐवजी वाईट झालेले राजकारण चांगले करण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. आज राजकारणात चांगल्या व्यक्तींची कमतरता आहे. ती कमतरता भरण्यासाठी चांगल्या तरुणांनी राजकारणात शिरकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा नेत्यांचे वारसच राजकारणात यशस्वी होतील. राज्य आणि देशाची प्रगती ही नेते मंडळींच्या हातात असते. त्यामुळे राजकारणात चांगल्या विचारांची आणि ज्ञानाची गरज आहे. ज्ञानी व्यक्तींनी राजकारणाकडे सकारात्मकदृष्टीने पाहणे गरजेचे आहे. राजकारणातील चांगल्या व्यक्तींना योग्य पद मिळाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्याचे उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवा आमदारांमुळे होतात कामेया परिसंवादात कोमसापच्या केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी युवा आमदारांमुळे युवकांसाठी कामे होत आहते. त्यामुळे निवडणुकांमध्ये युवकांनाही संधी मिळायला हवी असे भाष्य केले. त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे.राजकारण नेमके काय आहे, हे परिसंवादातून समजले. युवकांनी नेमके काय करायला हवे याची एक दिशाा मिळाली असे परिसंवादाला उपस्थित असलेल्या तरूणांनी सांगितले.
'‘शिक्षक’, ‘पदवीधर’सह युवकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची गरज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 1:11 AM