लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : गेल्यावर्षी कोरोना संसर्ग काळात लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा आता मात्र ऑक्सिजनची गरज तिपटीने वाढली आहे. रुग्णांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त असल्याने ऑक्सिजनची गरज वाढली असली तरी तूर्तास पालिकेने ऑक्सिजनचे नियोजन केल्याचे चित्र आहे. लिक्विड ऑक्सिजनचा रुग्णांना पुरवठा केला जात असून त्या व्यतिरिक्त पालिकेने ५७० जम्बो सिलिंडर आणि ८ ड्युरा सिलिंडर तैनात ठेवले आहेत.
मीरा-भाईंदर महापालिकेने पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात २५०, मीनाताई ठाकरे सभागृह येथे १६५, प्रमोद महाजन सभागृह येथे २०६ व अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात ९५ बेड कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन सुविधेसह उपलब्ध केले आहेत. गेल्यावर्षीही या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु यंदा रुग्णांची संख्या जास्त असल्याने ऑक्सिजनची गरजही वाढली आहे. गेल्यावर्षी पेक्षा तिपटीने आता ऑक्सिजनची गरज लागत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या रोज १८ ते २० केएल इतके ऑक्सिजन पालिका उपचार केंद्रात लागत आहे.
महापालिका प्रशासनाने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ऑक्सिजनच्या टाक्या उभारल्या आहेत. या टाक्यांमध्ये नियमित ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी ऑक्सिजनचा टँकर भाड्याने घेण्यात आला आहे. ऑक्सिजन मिळावा म्हणून पालिका विविध ठिकाणी प्रयत्नशील असून आगाऊ पैसेही देत आहे. आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह पालिकेचे अधिकारी यांच्या सततच्या प्रयत्न आणि नियोजनामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अजून तरी गंभीर परिस्थिती ओढवलेली नाही. उलट खासगी रुग्णालयांना अडचणीत ऑक्सिजन पुरवठा करून पालिकेने त्यांचे प्राण वाचवण्याची कामगिरी बजावली आहे. मध्यंतरी लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा असताना पालिकेने बॅकअपसाठी ठेवलेल्या जम्बो सिलिंडरचा वापर केला होता. ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
अग्निशमन दलाची पथके तैनात
ऑक्सिजन टाक्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दलाची पथके तैनात केली आहेत. ऑक्सिजन टाक्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनासुद्धा ऑक्सिजन टाक्यांची देखभाल व तिचा वापर कसा करावा, आदींचे प्रशिक्षण दिले गेले आहे.