ठाणे: वाहतुकीच्या नियमांची प्रत्येकालाच माहिती असते, परंतु ते पालन करण्याऐवजी ते तोडण्याचीच स्पर्धा लागलेली असते. या बेशिस्त वाहनचालकांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलीस शिस्त लावण्यासाठी संवाद साधतात. मात्र, वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल, तर वर्षभर कठोर कायद्यांचा बडगाही पोलिसांनी उगारावा. त्यासाठी कठोर कायदा अभियान राबवा, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रविवारी सुपर बाइक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री अनिता दाते, ठाणे वाहतूक पोलिसांचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर मंगेश देसाई, उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विस्तारणाऱ्या महानगरांसोबत रस्तेही विस्तारले आहेत, परंतु त्यावर असंख्य खड्डे असतात. खड्डे चुकविताना आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. आपल्या सुरक्षेची काळजी आणि अपघाताची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे येणार नाही. ही खबरदारी आपल्यालाच घ्यायची आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात आपण मास्क आणि सॅनिटायझर्स वापरायला शिकलो, तसेच मोटारसायकल चालविताना कायम हेल्मेट घालायलाही शिका, असा मोलाचा सल्लाही अनासपुरे यांनी दिला. प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर वाहतूक पोलिसांना अशा जनजागृती मोहिमा राबवाव्या लागणार नाहीत. तो दिवस लवकरच येईल, अशी आशा अभिजीत खांडकेकर यांनी व्यक्त केली.
* वाहनचालकांना ‘सुपर’ बुद्धी मिळो :
सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे जशी सुपर बाइक आहे, तशी प्रत्येक वाहन चालकाला नियम पालनासाठी ‘सुपर’बुद्धीही मिळावी, अशी सदिच्छा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
शानदार संचलन
रविवारी सकाळी ८ वाजता रॅलीला सुरुवात झाली. जवळपास ३०० सुपर बाइक्स या संचलनात सहभागी झाल्या होत्या. शहरात सुमारे २० किमीचे संचलन या बाइकस्वारांनी केले. या वर्षी प्रथमच रॅलीच्या मार्गावर दहा ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यात आरएसपीचे विद्यार्थी, रिक्षा संघटना, मोटार ड्रायव्हींग स्कुल आणि अन्य समाजसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या.
* या बाईक रॅलीमध्ये वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील हे आपल्या दहा वर्षीय मुलासह सहभागी झाले हाते. या दोघांनीही यावेळी हेल्मेट परिधान करून चालकासह मागे बसणाऱ्यानेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक असल्याचा संदेश दिला.
..............
नियम न पाळल्यामुळे ६० टक्के अपघात हे मोटारसायकलस्वारांचे होतात. जर सुपर बाइकस्वार शिस्त पाळत असतील, तर इतर लहान मोटारसायकलस्वारांनीही ती पाळली पाहिजे. हा हेतूही सुपर बाइक रॅली आयोजनामागे होता.
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर
.........................
०७ ठाणे बाइक रॅली