अंबरनाथ : निवडणुकीच्या प्रचारामध्ये धार्मिक प्रचाराला महत्त्व वाढत असतानाच अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांनी राजकीय व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. पूर्वी ईश्वराच्या प्रचारासाठी व्यक्तीचा माध्यम म्हणून वापर केला जात होता. हल्ली ईश्वराला माध्यम करून व्यक्तीचा प्रचार करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ती प्रथा बंद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांचा तीन दिवसीय हनुमान कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भागेश्वर महाराज यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राजकीय प्रश्नांना बगल देत महाराजांनी निवडणुकीमध्ये बजरंग बलाच्या नावाचा वापर करण्यावर नाराजी व्यक्त केली. कर्नाटक मधील बजरंग दलावर बंदी घालण्याच्या विषयावर विचारले असता बजरंग दल ही एक विचारसरणी असून त्या विचारसरणीला समाजातील काही घटक विरोध करू शकतील. मात्र तेच घटक बजरंग बलीला मात्र प्रत्यक्षात विरोध करणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून त्याचाच पुढचा टप्पा आता हिंदू राष्ट्र स्थापन होण्याची गरज बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केली. हिंदू राष्ट्रामध्ये इतर धर्माच्या लोकांना देखील तेवढेच महत्त्वाचे स्थान राहणे ही देखील गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास जातीवादी शक्तींना स्थान राहणार नाही आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केले. हल्ली देवांच्या नावावरच सर्व निवडणुका लढवल्या जातात, मात्र भविष्यात हिंदुराष्ट्राची स्थापना झाल्यास देवाच्या नावावर निवडणूक लढवण्याची गरजच भासणार नाही आणि केवळ विकासाच्या नावावर निवडणूक लढवल्या जातील अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. देशात हिंदू बहुसंख्या असताना देखील राम मंदिर उभारण्यासाठी 50 वर्ष वाट पहावी लागली, आज एक कृष्ण जन्मभूमी बाबत निर्णय घेता येत नाही ही शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सनातन हिंदू धर्म वाचवायचा असेल तर शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणाची ही गरज त्यांनी व्यक्त केली.