लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळवा रुग्णालयात न्यूमोनियाच्या उपचाराकरिता दाखल असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीच्या जांघेत गाइड वायर (सुई) अडकल्याची अत्यंत गंभीर बाब उघड झाली आहे. जांघेत अकडलेली सुई काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात संबंधित सर्जन नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे तिला मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी याच कळवा रुग्णालयात एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू झाला होता. याबाबतचा चौकशी अहवाल शासनाने दडपला आहे.
तीन वर्षांची ही मुलगी साधारणपणे एक महिन्यापूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिला न्यूमोनिया झाला होता. तिची प्रकृती अंत्यत खालावली असल्याने तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. यावेळी तिला सलाइन लावण्यासाठी हाताची शीर सापडत नसल्याने, तिला सेंट्रल लाइन टाकावी लागणार होती. त्यासाठी डॉक्टरांनी तिच्या पायाच्या शिरेतून सुई घालून तिच्यावर उपचार सुरू केले.
मात्र जांघेत गाइड वायर (सुई) अडकली. ती अद्याप काढता आलेली नाही. त्यावेळी तिची प्रकृती नाजूक असल्याने तिच्या पायातील सुई काढता येणे शक्य नव्हते, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. गाइड वायर सरळ असते. ती रुग्णांच्या शरीरात एक ते दीड महिना राहिल्यास काही धोका पोहोचत नसल्याचा दावा त्यांनी केला.
डॉक्टर, इतका निष्काळजीपणा कसा करू शकतात?
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी व्टीट करत कळवा रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली आहे. मुलीवर उपचार करताना पायातील जांघेत सुई तुटली असून, १६ दिवसांनंतरदेखील ती काढण्यात आलेली नाही. त्याकरिता आवश्यक सर्जन रुग्णालयात नाही. मुलीचा पाय सुजायला सुरुवात झाला आहे. त्यात मुलीचे काही बरेवाईट झाले, मुलीचा पाय कापावा लागेल. इतका निष्काळजीपणा डॉक्टर कसा काय करू शकतात, असा सवाल आव्हाड यांनी केला.
गाइड वायर काढण्यापेक्षा त्या मुलीचा जीव वाचवणे महत्त्वाचे होते. त्यानुसार मुलीवर योग्य उपचार करण्यात आले. आज ही मुलगी व्हेंटिलेटवर आणि ऑक्सिजनशिवाय श्वासोच्छ्वास घेत आहे. तिची प्रकृती उत्तम आहे. मुलीच्या शरीरातील गाइड वायर काढण्यासाठी लागणारे सर्जन उपलब्ध नसल्याचे तिला जेजे रुग्णालयात पाठवावे लागणार असल्याची कल्पना मुलीच्या पालकांना दिली आहे. - डॉ. अनिरुद्ध माळगावकर, अधीक्षक, कळवा रुग्णालय