प्रवाशांची वाढती संख्या पाहता पनवेल-वसई मार्ग रेल्वेसाठी भरपूर उत्पन्न देणारा ठरू शकतो. रेल्वेला ते हवे आहे, पण त्या तुलनेत सुविधा देण्याची त्यांची तयारी नाही. दिवा-पनवेल मार्गावरील स्थानके त्याचीच साक्ष देतात. येथील निळजे, दातिवली आणि आगासन या स्थानकातील प्रवाशांच्या पदरी कायमच उपेक्षा येते. ती केव्हा दूर होणार याचीच प्रदीर्घ प्रतीक्षा सुरू आहे. ज एका बाजूला प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपायोजना करत आहेत. प्रवासी टिकून रहावा यासाठी सातत्याने धडपड केली जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा दिवा-पनवेल मार्ग तयार केला. आज या मार्गावरून कोकण मार्गावरील गाड्या तसेच मालगाड्यांची वाहतूक सुरू असते. हा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर ठरला आहे. वसई किंवा तेथून पुढे जाण्यासाठी या मार्गाचा प्रवासी वापर करू लागले. पण या मार्गावर निळजे, आगासन आणि दातीवली स्थानके आहेत. पण आज त्यांची अवस्था पाहिली तर यांना रेल्वे स्थानक का म्हणावे असा विचार करावा लागतो. सुविधांचा अभाव, सुरक्षितता वाऱ्यावर, कुठे फलाटच नाही, जेथे फलाट आहे तेथे घाणीचे साम्राज्य, गवत उगवलेले. तरीही या स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी आहेत. दिवा-वसई मार्ग आता पनवेलपर्यंत गेला आहे. त्यामुळे पनवेल-वसई गाड्या या मार्गावरून धावू लागल्या. येथील मेमू गाड्यांना ठराविक वेळेत प्रचंड गर्दी असते. अशा या दिवा-पनवेल मार्गामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. बडया बिल्डरांकडून गृहप्रकल्प राबवले जात आहेत. रेल्वे स्थानकाच्या नावाखाली नागरिकांनीही घरे खरेदी केली. आज ना उद्या या स्थानकांचा विकास होईल अशी या ग्राहकांना भाबडी आशा आहे. प्रत्यक्षात या मार्गावरील प्रवासी हे रामभरोसे आहेत. तिन्ही स्थानके ओसाड आहेत. कधी होणार या स्थानकांचा विकास असा संतप्त सवाल येथील प्रवासी विचारत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखलही घेतली जात नाही. ही वस्तूस्थिती आहे.
निळजे, दातिवली, आगासनचे प्रवासी रामभरोसे
By admin | Published: July 17, 2017 1:17 AM