अंबरनाथ - येथील प्राचीन शिव मंदिराला अनेक ठिकाणी सध्या गळती लागली आहे. मंदिराच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने या मंदिराच्या शिल्पांवर झुडुपे उगवली आहेत. ती मोठी होत असूनही ती काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे.प्राचीन शिव मंदिरावरील शिल्प जीर्ण होत असतानाच या मंदिराला अनेक ठिकाणी गळतीही लागली आहे. त्यातच मंदिराची नियमित देखभाल होत नसल्याने आता मंदिरावर लहान, मोठी झुडुपे वाढत आहेत. मंदिराच्या दोन शिल्पांना जोडणाऱ्या दगडांच्यामध्ये मातीचा थर साचत असल्याने त्या ठिकाणी गवत आणि लहान जंगली झुडुपे वाढत आहेत. मंदिराच्या कळसापासून ते मंदिराच्या पायथ्यापर्यंत सर्वत्र ही झुडुपे वाढली आहेत. मात्र, ती काढण्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष होत आहे. मंदिराच्या शिल्पांकडे आणि मंदिराच्या देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याचा दावा करणारे प्रशासन मंदिराच्या शिल्पाकडे दुर्लक्ष करत आहे.मंदिराच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात आलेली दिसत नाही. मंदिराच्या बाहेर सुरक्षारक्षक ठेवण्यापुरतीच उपाययोजना आखण्यात आली आहे. मात्र, मंदिराच्या स्वच्छतेसाठी आणि मंदिर शिल्पांच्या सुरक्षेसाठी कोणतीच यंत्रणा राहिलेली नाही. मंदिरावरील वाढलेली झुडुपे काढण्यासाठी पुरातत्त्व खात्याने पुढाकार घ्यावा.
अंबरनाथमधील शिव मंदिराच्या देखभालीकडे दुर्लक्ष, शिल्पांवर झुडुपे, अनेक ठिकाणी गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 1:43 AM