सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ टेलिफोन एक्सचेंज जवळील महापालिका ७०५ नावाचे उद्यान अतिक्रमणाचा विळख्यात सापडले. महापालिकेने वेळीच कारवाई केली नाहीतर, काही वर्षात उद्यान गिळंकृत होणार असल्याची भीती नागरिकांसह नगरसेवकांनी व्यक्त केली.
उल्हासनगर महापालिकेचे मोजकेच भूखंड सुरक्षित राहिले असून कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरातील टेलिफोन एक्सचेंज जवळील ७०५ नावाच्या भूखंडावर तात्पुरता निवारा केंद्र बांधण्यात आले होते. मात्र बीएसयूपी योजना बाळगल्याने, दीड कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या निवारा केंद्र पालिकेने जमीनदोस्त केला. भूखंड भूमाफियांच्या घशात जाईल, या भीतीने नगरसेवक जीवन इदनानी यांनी लाखो रुपये खर्चून भूखंडावर उद्यान उभे केले. दरम्यान भूखंडाला एका बाजूने सरंक्षण भिंत नसल्याने, शेजारील दुकाने उद्यानात अतिक्रमण करीत आहे. असेच अतिक्रमण सुरू राहिल्यास भविषयात मैदान इतिहास जमा होणार असल्याची भीती नगरसेवक इदनानी यांनी व्यक्त केली. याबाबत आपण पालिकेला पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले. मात्र महापालिकेकडून कारवाई होत नसल्याची नाराजीही व्यक्त केली. उद्याना शेजारी महापालिकेचे बांधकाम परवान्यांचे बनावट फलक लावून अवैध बांधकाम सुरू आहे.
गेल्या महिन्यात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शहरातील अवैध बांधकामा बाबत चिंता व्यक्त करून कारवाईची मागणी केली होती. तर उपायुक्त प्रियंका रजपूत यांनी रविवारी एका अवैध बांधकामावर कारवाई करून अवैध बांधकामाची यादी तयार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक न्यूज चॅनेलला दिली होती. प्रत्यक्षात त्यानंतर अवैध बांधकामावरील कारवाई थंडाविल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. याबाबत उपायुक्त रजपूत यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. तर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याची प्रतिक्रिया दिली. महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी सुरू असलेल्या बांधकाम बाहेर महापालिका परवान्यांबाबत सविस्तर नामफलक लावणे बंधनकारक असल्याचे म्हटले.