नितिन पंडीत
भिवंडी - देशभरात ओढवलेल्या करोनाच्या संकटाचा सामना करताना अनेकांना मृत्यू येत आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यात करोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी बाहेर हाउसफुलचा बोर्ड लावण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे. तर, अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा देखील तुटवडा पडत आहे. अशा परिस्थितीत विद्युत दाहिनी ही प्रत्येक महापालिका क्षेत्रात असावी अशी गरज व्यक्त होत आहे. त्यात, भिवंडीतील विद्यूत शवदाहिनी बंद असल्याने संताप व्यक्त होत आहे.
काळाची गरज ओळखून कित्येक ठिकाणी त्याबाबत उपाययोजना केली जात आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात सन १९९० मध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना शिवाजी चौक येथील स्मशानभूमीत लाखो रुपये खर्च करून विद्युत दाहिनी उभारण्यात आली. सुरुवातीला एका बेवारस मृतदेहावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करून तिचा शुभारंभ केला. परंतु त्यानंतर ती नादुरुस्त झाली व त्यानंतर सन २००५ मध्ये आलेल्या पुरामध्ये नजीकच्या खाडीचे पाणी याठिकाणी शिरल्यावर अर्धी इमारत पाण्यात बुडाल्यानंतर येथील यंत्रसामुग्री बंद पडली. ती आजपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी कधी केलाच नाही.
अत्यावश्यक नसलेल्या विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात स्वारस्य असणाऱ्या लोकप्रतिनिधींना पर्यावरणाचा ऱ्हास टाळणाऱ्या विद्युत दाहिनीस सुरू करण्याचे प्रयत्न कधी झालेच नाहीत. त्यामुळे सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली संपूर्ण इमारत व त्यामधील यंत्रसामग्री गंजलेल्या व सडलेल्या अवस्थेत येऊन पडली आहे, हे भिवंडीकरांचे दुर्दैव. भिवंडी मनपा प्रशासन कोरोना महामारी संकटात तरी या विद्युत शव दाहिनीच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार का, हाच एक प्रश्न आहे.