अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील डेंटल महाविद्यालय मध्ये उभारण्यात आलेल्या पालिकेच्या कोविड रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. कर्मचारी आणि रुग्णांना देण्यात येणार्या सकाळच्या न्याहारीत लाल पाखरू आढळल्याने एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याआधी देखील जेवणामध्ये आळी सापडण्याचा प्रकार घडला होता. अंबरनाथ नगरपालिकेचा डेंटल महाविद्यालयात दररोज रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पुरवण्यात येते. त्यासाठी खाजगी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. मात्र या ठेकेदारामार्फत पुरवण्यात येणाऱ्या नाश्ता आणि जेवणामध्ये आळ्या आणि पाखरू सापडत असल्याने याबाबत पालिकेने नाराजी व्यक्त केली होती.
पालिकेने ठेकेदाराला या आधी देखील ताकीद दिली होती. मात्र तरीदेखील त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. रविवारी सकाळी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी पाठवण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये साबुदाण्याच्या खिचडीत चक्क लाल रंगाचा पाखरू आढळला. त्यानंतर याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्याने रुग्णालयाचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे केली. संपूर्ण नाष्टा फेकून देण्यात आला.
कोरोनावर उपचार करणाऱ्या कर्मचारी आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जिवाशी का खेळले जात आहे हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा नाश्त्यामध्ये पाखरू सापडल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सुरुवातीच्या काळात ठेकेदाराचे स्वस्तात मिळणारे जेवण बंद करून पालिकेने महाग जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराला काम देऊन देखील त्या जेवणाचा दर्जा योग्य पद्धतीने राखला जात नसल्याने आता नाराजीचा सूर उमटत आहे. या प्रकारानंतर पालिकेचे कोणतेही अधिकारी काहीएक बोलण्यास तयार नाही.