भातसानगर(जि. ठाणे) : गावापासून २५ किमीवर आरोग्य केंद्र. तिथपर्यंत जायला रुग्णवाहिकेलाही वाट नाही. अवघडलेल्या महिलेला झोळीतून नेत असताना वाटेतच उघड्यावर तिची प्रसूती झाली. हा प्रकार रविवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पटकीचा पाडा घडला असून सुदैवाने प्रसूत महिला व बाळ सुखरूप आहे.
तालुक्यातील पटकीचा पाडा येथून सुमारे २५ किमी अंतरावर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कसारा ते वेळूकपर्यंत रस्ता आहे. मात्र, पटकीचा पाडा ते वेळूक या किमान चार ते पाच किमी अंतराचा रस्ताच नसल्याने पटकीच्या पाड्यातील गंभीर रुग्णांना झोळी शिवाय पर्याय नसतो.
रस्ता नाही
२०१८ मध्ये मंजूर झालेला वेळूक ते पटकीचा पाडा रस्ता अजूनही झाला नाही.
रस्ता होण्यासाठी कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच झाले नाही.
विशेषतः पावसाळ्यात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.
झोळीतून प्रवास
पटकीचा पाडा येथील प्रणाली वाघे (२०) हिला रविवारी सकाळी प्रसववेदना होऊ लागल्या. पटकीचा पाडा येथून तिला चार किमी पायपीट करत झोळीतून वेळूकपर्यंत नेले जात असताना वाटेतच उघड्यावर तिची प्रसूती झाली. सोबतच्या महिलांनी प्रणालीला सावरले व तिला धीर दिला.
आशासेविकांनी वेळूक येथे वाहन उपलब्ध करून दिले होते. त्या वाहनातून प्रणालीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचार केल्यानंतर प्रसूत महिला व बाळ दोघांची प्रकृती सुखरूप असल्याचे तेथील डॉ. सुवेदिका सोनवणे यांनी सांगितले.