ठाणे - नेपाळमध्ये आज सकाळी तारा एअरच्या एका छोट्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. १९ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर असलेल्या या विमानाचा अचानक संपर्क तुटल्यानंतर ते अपघातग्रस्त झाल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान, या विमानामधून प्रवास करणारे भारतीय प्रवासी हे ठाण्यातील कुटुंब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र बचावपथक अद्याप विमानापर्यंत पोहोचू शकलेले नाही, त्यामुळे प्रवाशांचा अद्याप ठावठिकाणा लागू शकलेला नाही.
दरम्यान, अपघातग्रस्त विमानातील चार प्रवासी हे ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबीय असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील रुस्तमजी येथे राहत असलेल्या त्रिपाठी कुटुंब नेपाळला फिरायला गेले होते. तिथेच ते प्रवास करत असलेल्या विमानाला हा अपघात झाला आहे. यामध्ये अशोक त्रिपाठी (५४), वैभवी बांदेकर (५१), धनुष त्रिपाठी (२२) आणि रितिका त्रिपाठी (१५) यांचा समावेश आहे. आता त्यांच्या घरी त्यांची 80 वर्षीय आई एकटीच आहे.
आज सकाळी ते प्रवास करत असलेले विमान बेपत्ता झाले होते. त्यानंतर या विमानाला अपघात झाल्याचे समोर आले होते. " हे विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताच्या दिशेने वळले, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही,” अशी माहिती मुख्य जिल्हाधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी दिली. तर दुसरीकडे कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल आणि एअर होस्टेस किस्मी थापा हे विमानात होते, असं तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांच्याकडून सांगण्यात आलं.