भिवंडी : बँकेच्या कॉम्प्युटरमधील नेटवर्क बंद असल्याने पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाची भामट्याने ४५ हजारास फसवणूक केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध बँकेच्या व एटीएमच्या परिसरांत भामटे फिरत असून ते भोळ्याभाबड्या बँक ग्राहकांची फसवणूक करून त्यांना लुबाडत असल्याच्या घटना घडत आहेत.कल्याणरोड येथील पंजाब नॅशनल बँकेत आनंदकुमार गणेश सिंग हा कामगार आपल्या खात्यात पैसे भरण्यास गेला असता बँकेतील काँम्प्युटरचे नेटवर्क बंद होते. त्यामुळे तो बँकेतच बसुन होता. त्याच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्याने मनी ट्रान्सफर करण्यासाठी सांगून जवळच असलेल्या विजया बँकेच्या शेजारील मनी ट्रान्सफरच्या आॅफिसजवळ नेले.तेथे दोघांनी काळ्या पिशवीत १ लाख ३० हजार रुपये असल्याचे भासवून त्याच्या हवाली करीत आनंदकुमारकडील ४५ हजार रूपये घेतले व पळून गेले. ते तेथून गेल्यानंतर त्याने पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये रूमालात बांधलेले कागदाचे तुकडे मिळाले.तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आनंदकुमार सिंग याने शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार केली.
बँकेतील नेट बंदचा फटका ग्राहकाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 12:59 PM