टिटवाळा : ‘सोशल बार्बर’ अशी ओळख असलेल्या रवींद्र बिरारी यांनी तीन वर्षांपासून टिटवाळा परिसरात वटपौर्णिमेला अनोखा उपक्रम राबवत आहेत. वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या महिला वडाच्या झाडाला वाण वाहतात. त्यामध्ये आंबा, फणसाचे गरे, केळी अशी विविध फळे असतात. हे वाण जमा करून गरीब त्यांनी गरीब वस्तीतील मुलांना वाटले. या वर्षी त्यांच्या या उपक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. यंदा ४२ महिलांनी दिलेल्या वाणांतून १७५ पुरणपोळ्या जमा झाल्याचे बिरारी यांनी सांगितले.वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाला वाहत असलेली फळे, अन्नपदार्थांची नासाडी होते. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरजूंना हे अन्न मिळाले तर त्यांची पोटाची भूक भागेल आणि नासाडीही टळेल, या विचारातून बिरारी यांना ही कल्पना सुचली. श्रद्धेला कुठेही धक्का न लावता त्यांनी सतीचे वाण दान करण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांनी महिलांना यामागचा उद्देश पटवून दिला. अनेक महिलांना त्यांचा हा उपक्रम आवडला असून त्यांनी आपल्या मैत्रिणींनाही याबाबत सहकार्याचे आवाहन केले. त्यामुळे दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे.केशकर्तन हा बिरारी यांचा व्यवसाय आहे; मात्र हा व्यवसाय त्यांनी स्वत:पुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. रेल्वे स्टेशनवर राहणारे अपंग, निराधार वृद्ध आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींची ते केस, दाढी मोफत करतात. मनोरुग्णांनी काही वेळा त्यांच्यावर हल्ले केले. अनेकदा त्यांना संसर्ग होऊ न ते आजारीही पडले. मात्र तरीही त्यांनी या समाजसेवेत कधीच खंड पडू दिला नाही. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊ न एका कंपनीने ‘द सोशल बार्बर’ हा लघुपट बनवला आहे. मदत ही पैशानेच करता येते असे नाही. तुमचा उद्देश प्रामाणिक असेल तर आपल्याकडे जे आहे, त्यातूनही अनेकांना समाधान देऊ शकतो, अशी भावना बिरारी यांनी व्यक्त केली.
वाणांमधील नैवेद्याने गरिबांचे तोंड गोड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:58 AM