ठाणे : शून्यावर असताना अनेक मोह, फसवे सापळे असतात, शॉर्टकट असतात. त्यातून वेळीच सुटका केली तर शिखर गाठणे सोपे होते. त्यामुळे शून्यावर असताना खंत, तर शिखरावर असताना अहंकार करायचा नाही, असा सल्ला विमान कंपनीचे संचालक मंदार भारदे यांनी दिला.ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शनिवारी भारदे यांनी त्यांच्या विमान कंपनीचा प्रवास उलगडला. यावेळी त्यांना ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी बोलते केले. भारदे पुढे म्हणाले की, या व्यवसायाविषयी सुरुवातीला काहीच माहिती नव्हती. राज्यातील काही मंत्र्यांना सेवा देण्यास सुरुवात केली.आज सर्व राजकारणी, कलाकार यांना मी सेवा देत आहे. यादरम्यान आहे त्या स्थितीत शांत राहून काम कसे करावे, हे मी काही नेत्यांकडून शिकलो. आता आम्ही स्वत:चे एअर लाईन परमिट काढले असून लवकरच स्वत:च्या कंपनीची एअरलाइन अॅम्ब्युलन्स सुरू करणार आहोत. त्यात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांतील रुग्णांना त्याद्वारे माफक दरात सेवा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.आयुष्यात लोक काय म्हणतील, याचा विचार बाजूला सारला तर तिथून नवनिर्मितीला सुरुवात होते. आपण ज्यांना घाबरत असतो त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर अधिक वेगाने प्रगती करता येते. अंतिम ध्येयापेक्षा त्यासाठी झालेला प्रवास हा अधिक रंजक असतो. त्यामुळे शून्यावरून शिखरावर जाताना खूप मजा येते. मात्र, या प्रवासात शॉर्टकट न घेता वाटचाल केल्यास ध्येय निश्चित साध्य होते असेही ते म्हणाले.‘एक्स्प्लोर मराठा’ असा रूटहेलिकॉप्टरमधून सह्याद्री पर्वतरांग खूप वेगळी आणि भव्य दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आकाशातून पाहून राजांची व्हिजन समजते. त्यामुळे आपल्याकडील गडकिल्ल्यांची संपदा परदेशी नागरिकांना दाखवण्यासाठी आम्ही ‘एक्स्प्लोर मराठा’ असा रूट तयार केला आहे.परदेशी नागरिकांना हेलिकॉप्टरमधून गडकिल्ले दाखवतो. भविष्यात दुर्गम डोंगराळ भागात वृक्षारोपण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सीड बॉम्बिंग करण्याचा मानस भारदे यांनी व्यक्त केला.