- अजित मांडके, ठाणेलोकसभा निवडणुकीत युतीत लढलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने शब्द पाळला नसल्याचे कारण पुढे करीत नव्या समीकरणांची नांदी केली. ती राज्यात अमलात येण्यापूर्वीच ठाण्यात साकार झाली आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेत आणि महापौर निवडणुकीतही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाआघाडी उदयाला आली आहे. आता ही दोन टोकांच्या विचारांची आघाडी किती टिकेल, त्यांचे आचारविचार परस्परांना किती पटतील, मतदारांच्या ही आघाडी किती पचनी पडेल, हे सर्व लागलीच सांगणे कठीण आहे. मात्र तूर्तास ही आघाडी भाजपची डोकेदुखी वाढवणार हे निश्चित दिसत आहे. ठाण्यात लागलीच महाआघाडीचे चित्र दिसत असले तरी येत्या काळात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदरसह इतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही हीच राजकीय समीकरणे घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपला सर्वच पातळ्यांवरून हद्दपार करण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी केली आहे. सत्ता संपादनासाठी ही महाआघाडी आकर्षक वाटत असली तरी जागांच्या वाटपावरून आपापसात संघर्षाचे राजकारण चांगलेच गाजेल, असे चित्र या महाआघाडीच्या निमित्ताने निर्माण झाले आहे.राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हा दावा सुरुवातीपासून शिवसेनेकडून सुरू होता. भाजपशी काडीमोड घेत आता शिवसेना, राष्टÑवादी आणि कॉंग्रेस अशी तीन पक्षांची महाआघाडी सत्तेची चव चाखण्यासाठी सज्ज होत आहे. ही तिघाडी राज्याला स्थिर सरकार देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस यांची समीकरणे जुळली व स्थिर सरकार देणे शक्य झाले तर येत्या काळात हीच समीकरणे महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका आदी ठिकाणी जुळवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ज्या ज्या पातळीवर भाजप पोहोचली आहे, त्या त्या ठिकाणावरून त्यांना हद्दपार करण्यासाठी ही आघाडी स्थापन झाली आहे. आता ठाणे महापालिकेतही हीच समीकरणे रुजवण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडेच झालेल्या महासभेत ही आघाडी एकत्र आल्याचे दिसून आले होते. तर, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून राष्टÑवादीला विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करुन या आघाडीवर जणू एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे महापौर निवडणूक ही आता केवळ औपचारिकता झाली आहे. सध्या महापालिकेत शिवसेनेकडे ६७ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. राष्टÑवादीकडे ३४, भाजप २३, काँग्रेस तीन, अपक्ष दोन आणि एमआयएमचे २ असे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे भाजपचे संख्याबळ हे २३ चे असले तरी त्यांच्याकडे आयात केलेल्या नगरसेवकांची संख्या ही तब्बल १८ आहे. त्यामुळे भविष्यात भाजपकरिता ही धोक्याची घंटा मानली जात आहे. या तिघाड्यामुळे राज्यातील सत्ता भाजपने न राखल्यास आयात केलेल्या या नगरसेवकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेची साथ लाभली तर राष्टÑवादीला ठाण्यात भाजपपेक्षा अधिक जागांवर वाढण्याची संधी मिळणार आहे. काँग्रेसचे एकेकाळी ठाण्यात २० नगरसेवक होते व शहरावर वर्चस्व होते. त्यामुळे या तिघाडीमुळे आता त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. या तिघाडीत आपली पोळी भाजून घेण्यासाठी काँग्रेसही तयारीला लागल्याचे चित्र आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने राष्टÑवादीच्या कुबड्या घेऊन ठाण्यात आपले बस्तान पुन्हा मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या तिघाडीत सामील होण्यासाठी मनसेही पुढे येण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणारी नाही. सध्या मनसेचा ठाण्यात भोपळा आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांवरून ते सुद्धा महापालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी आपली बाजू भक्कम करण्यासाठी आंदोलने, समस्यांवरून आवाज उठवणे आदींसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता या प्रयत्नांना राष्टÑवादीच्या कुबड्या आणि शिवसेनेची साथ मिळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.राज्यात तीन पक्षांची आघाडी स्थापन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मात्र, ठाण्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी आघाडी यापूर्वीच उदयाला आलेली होती. ठाणे महापालिकेत लागलीच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येऊन भाजपला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हेच समीकरण नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली व अन्य शहरांत जुळवले जाणे अपेक्षित आहे.लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचादेखील ठाण्यातील महत्त्वाच्या भागांमध्ये हमखास मतदार तयार झाला आहे. त्यामुळे ही मते कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. सध्या जुन्या ठाण्याचा विचार केला तरी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांना याच जुन्या ठाण्याने सावरल्याचे दिसून आले आहे. भाजपला सर्वच सत्तापदांवरुन खाली खेचण्यासाठी, त्यांचा माज उतरवण्यासाठी ही नवी समीकरणे जुळवली गेली असली तरी त्याचा लाभ कुणाला होतो व नुकसान कुणाचे होते, हे लागलीच सांगता येणे शक्य नाही.ही नवी समीकरणे आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला फटका देणारी तर अधिक प्रमाणात बसून राष्टÑवादी आणि कॉंग्रेसला फायदेशीर ठरणारी असतील, असा एक मतप्रवाह आहे. याच समीकरणांच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचे ठरवल्यास त्यामुळे शिवसेनेतील असंतोष वाढण्याची शक्यता बोलली जात आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे समीकरण जुळून आले होते.
नव्या समीकरणांची नांदी ठाण्यातून झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 10:56 PM