अनिकेत घमंडी, डोंबिवलीकसारा मार्गावरील आसनगाव व आटगाव रेल्वे स्थानकांदरम्यान सावरोली हे नवे रेल्वे स्थानक उभे करण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली असून ते त्याकरिता प्रयत्नशील असताना वासिंद व आसनगाव स्थानकांदरम्यान वेल्होळी हे नवे स्थानक उभारण्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश इगतपुरी येथील मुख्य वाणिज्य प्रबंधक यांना रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. मात्र, यापूर्वी गुरवली व मानसरोवर या दोन रेल्वे स्थानकांचे प्रस्ताव प्रलंबित असताना हा नवा प्रस्ताव रेटला जात असून नवे सरकार आल्यावर नवी रेल्वे स्थानके उभी करण्याची साथ का येते, असा सवाल प्रवासी व प्रवासी संघटना करीत आहेत.खासदार पाटील यांनी आसनगाव व आटगाव स्थानकांदरम्यान सावरोली स्थानक उभे करण्याची मागणी केली आहे. एकीकडे खासदार ही मागणी लावून धरत असताना रेल्वे प्रशासन वासिंंद-आसनगाव स्थानकांदरम्यान वेल्होळी स्थानक उभारण्याबाबत सर्वेक्षण करण्याकरिता आग्रही असून तसे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. मात्र, खडवली स्थानकाजवळ गुरवली स्थानक उभे करण्याची मागणी गेली कित्येक वर्षे प्रलंबित असून हरिभाऊ बसवंत हे खासदार असताना त्यांनी ही मागणी केली होती व त्याला तत्कालीन खासदार स्व. रामभाऊ कापसे यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. याखेरीज, आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मानसरोवर हे स्थानक उभे करण्याची मागणी स्थानिक जैन धर्मीयांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. ती मागणीही प्रलंबित आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे नंदकुमार देशमुख हे मानसरोवर स्थानकाची मागणी मंजूर व्हावी, याकरिता प्रयत्नशील आहेत. असे असताना नवीन रेल्वे स्थानकाची मागणी पुढे का रेटण्यात येत आहे, असा सवाल केला जात आहे.
नवे सरकार, नवी स्थानके
By admin | Published: November 23, 2015 2:02 AM