मीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट आज तौत्के चक्रीवादळाच्या चक्रात अडकली. बोटीवर एकूण ६ जण असून वादळ आणि खवळलेल्या समुद्रात बोट आणि स्वतःचा जीव राखण्यासाठी त्यांची सोमवार रात्रीपर्यंत धडपड सुरू होती. तौत्के चक्रीवादळाचा इशारा मच्छीमारांना आधीच दिला गेला होता. रविवारपर्यंत भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
डायमंड मिरांडा यांची मच्छीमार बोट मात्र किनाऱ्यावर वेळीच परतण्यास निघाली नाही. जेणे करून ती आता समुद्रात चक्रीवादळाच्या फेऱ्यात अडकली आहे. बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा असून अन्य ५ खलाशी आहेत. हे सर्व खलाशी झारखंडचे आहेत. रविवारी सदर बोट समुद्रातील ओएनजीसीच्या एका वापरात नसलेल्या इंधन विहिरीच्या रिंग वर गेली होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्र किनारा जवळ सुमारे ४ तासांवर असल्याने तेथे आश्रयाला जा असे निर्देश देण्यात आले होते. परंतु नाखवा व खलाशी यांनी भाईंदरचा पाली किनारा गाठण्यासाठी निघाले.
समुद्रात चक्रीवादळाने गाठल्याने प्रचंड वादळीवारा, पाऊस व खवळलेला समुद्र अशा कात्रीत बोट आणि मच्छीमार सापडले. किनाऱ्या पासून सुमारे ११ नॉटिकल मैलावर खवळलेल्या समुद्रात एका खडकाला नांगर टाकून सर्वजण बोट टिकवून ठेवण्याची धडपड करत होते. त्यांचा वायरलेसवरून घरच्यांशी संपर्क सुरू होता. मंडळ अधिकारी प्रशांत कापडे सुद्धा बोटीवरील जस्टिन यांच्या शी वायर्सल्स वरून संपर्क करून माहिती देत होते. उसळलेल्या समुद्रात बोट चक्रीवादळाच्या दिशेने ओढली जात होती. टाकलेला नांगर तुटल्यानंतर नाखवाने बोट भाईंदर किनारी नेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वादळाचा प्रचंड जोर असल्याने बोट भरकटत होती.
अखेर काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा समुद्रात नांगर टाकून बोट व स्वतःचा जीव वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. नाखवा मिरांडा यांना वादळ शांत होत नाही तोपर्यंत नांगर टाकून थांबा किंवा डहाणूच्या किनारी आश्रयाला जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांचा घरच्यांशी वायरलेस वरून संपर्क सुरू आहे अशी माहिती प्रशांत कापडे यांनी दिली. दरम्यान बोटीसह नाखवा आणि खलाशी सुखरूप परत यावेत यासाठी मिरांडा कुटुंबीय आणि पालीगावात प्रार्थना केल्या जात आहेत . तर चक्रीवादळामुळे किनाऱ्यावरून मदत पाठवणे अवघड झाले आहे.