सुरेश लोखंडे, ठाणेशिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा नेहमीच वादाचा व चर्चेचा विषय म्हणून गाजतो. परंतु, आता आधीच्या अध्यादेशाचा विचार न करता ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारीला नवीन अध्यादेश जारी करून दरवर्षी होणाऱ्या पाच टक्के प्रशासकीय (समायोजन) बदल्या कायमच्या रद्द केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार आहेत. शिक्षकांच्या या बदल्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतर अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र या दोन प्रकारचे वर्गीकरण करून त्यातील गावे व शाळा निश्चित कराव्या लागणार आहेत. यानुसार ३१ मेपर्यंत बदल्या कराव्या लागणार असून वेळीच अहवाल देण्याची सक्ती आहे. शाळेत, गावात पोहोचण्यासाठी दळणवळणाच्या सोयीसुविधा नसणे, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे, रस्ता करण्यास प्रतिकुल नसलेले गावे व त्यातील शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश होणार आहे. अवघड क्षेत्रात तीन वर्ष सलग सेवा केलेल्या शिक्षकाची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्राधान्याने करावी लागणार आहे. या शाळेत जागा रिक्त नसेल, तर तेथे एखाद्या शिक्षकाची सलग दहा वर्ष सेवा झालेली असल्यास ते शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. त्या रिक्त जागी संबंधीत शिक्षकाची बदली करावीच लागणार आहे. म्हणजे अवघड क्षेत्रातील शाळेत प्रत्येक शिक्षकाला तीन वर्ष सेवा करावीच लागणार आहे. त्यानंतरच त्यास सर्वसाधारण क्षेत्रातील पसंतीच्या शाळेवर बदलीचा अधिकार मिळणार आहे. दरवर्षी ३१ मेपर्यंत या बदल्या कराव्याच लागणार आहेत. अवघड क्षेत्रातील तीन वर्ष सेवा करणारे बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षकांप्रमाणेच विशेष संवर्ग शिक्षक भाग १ व भाग २ संवर्गातील शिक्षक सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र असतील. यामुळे शिक्षकाला आवडत्या शाळेत दीर्घकाळ सेवा करता येणार नसल्याचे उघड झाले आहे.
शिक्षक बदल्यांसाठी आता नवीन आदेश
By admin | Published: March 15, 2017 2:26 AM