ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभा संपत असताना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला. या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाने विरोध केला होता. मात्र, विरोधकांचा विरोध डावलून शिवसेनेने प्रस्ताव रेटला. सध्या ठाण्यात समस्यांचा डोंगर असताना नवे ठाणे विकसित करण्यामागे बिल्डरहित दडले असल्याचे आरोप होत आहेत.खारबाव आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांचा समावेश नवीन ठाणेमध्ये करून या भागाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका व एमएमआरडीए यांची संयुक्त नेमणूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत ठाणे महापालिकेने मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. विरोधक आपली भूमिका मांडणार, त्याआधीच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपली भूमिका विशद केली. हा प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजूर केला तरीसुद्धा या भागाचा विकास होणार असल्याचे मत आयुक्तांनी मांडले. परंतु, महापालिकेला एकही पैसा खर्च न करता या योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेतल्यास ठाण्याचेही नाव होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नवीन ठाण्याचा विकास होताना सध्याच्या ठाणे शहराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. ठाण्याचे २०० हेक्टर क्षेत्र विकसित होण्यास हातभार लागणार असल्याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले. शहर विकास विभागाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनीही या भागाच्या विकासाची का गरज आहे, हे सांगितले. शहराचा डीपीआर मंजूर झाल्यानंतर आजही काही आरक्षणांचा विकास करता आलेला नाही. नव्या प्रस्तावामुळे आरक्षणे विकसित होण्यास चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सत्ताधाºयांविरोधात विरोधकांच्या घोषणाआयुक्त आणि शहर विकास अधिकारी यांच्या युक्तिवादाने विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी एमएमआरडीएने येथील सर्व्हे करताना अर्धा भाग का वगळला, असा सवाल केला.नजीब मुल्ला यांनी इतर मुद्दे मांडण्याचाही प्रयत्न केला. मात्र नरेश म्हस्के यांनी वेळेचे कारण देत विरोधकांना रोखले. विरोधकांनी अगोदर आयुक्तांचे कौतुक केले आणि आता त्यांना विरोध करत असल्याकडे म्हस्के यांनी लक्ष वेधले.नवीन ठाण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर, सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. विरोधकांनी सत्ताधाºयांविरोधात घोषणाबाजी करत या विषयावर सखोल चर्चेची मागणी केली.नवीन ठाण्याच्या विषयासह कोस्टल रोड, खाडीवरील उड्डाणपूल या विषयांवर महासभेत मोठा गदारोळ झाला. या गोंधळातच मंजुरी घेऊन सत्ताधाºयांनी महासभा आटोपती घेतली.
नवीन ठाण्याचा प्रस्ताव गोंधळात मंजूर;विशेष नियोजन प्राधिकरणाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:22 AM