ठाणे : ठाणे शहरात कोपीनेश्वार सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा राष्ट्रीय एकात्मकतेचा नारा देण्यात आला आहे. या यात्रेत तलाव संवर्धन, इंधन बचत या विषयांवरही दृष्टीक्षेप टाकण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरातील प्रमुख सात तलावांची पहाणी या यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे. हे तलाव स्वच्छ असावेत अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली असून या पहाणी नंतर तलाव संवर्धन आणि स्वच्छतेविषयी स्वतंत्र्य कार्यक्रम राबविण्यात येईल असे सांगण्यात आले.
यावर्षीच्या स्वागतयात्रेच्या स्वागताध्यक्षा म्हणून डॉ. मेधा मेहंदळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कविता वालावलकर निमंत्रक आणि कुमार जयवंत सहनिमंत्रक आहेत. यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आत्तापर्यंत १८ चित्ररथांनी नाव नोंदविले असून शेवटच्या दिवसात या चित्ररथांची संख्या ५० पर्यंत जाईल, अशी माहिती कौपीनेश्वर न्यासाचे विद्याधर वालवलकर यांनी दिली. ठाणे पूर्व, कळवा, ब्रह्मांड, ऋतुपार्क या ठिकाणी उपयात्रा काढण्यात येणार आहेत. ही यात्रा बाजारपेठेतून जांभळी नाका, रंगो बापुजी चौक,गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास सर्कल, नौपाडा पोलीस ठाणे, विष्णुनगर, राम मारूती पथ, तलाव येथून मार्गस्थ होणार आहे. या स्वागत यात्रेत 'हम करे राष्ट्र आराधन' चा नारा देण्यात येणार आहे. नववर्षाच्या पूर्व संध्येला सायंकाळी ४ वाजता सायकल रॅली काढण्यात येणार असून १०० ते २०० सायकलस्वार या यात्रेत सहभागी होणार आहेत. मध्यवर्ती कारागृह परिसरातील तलावापासून मुख्य शहरातील वेगवेगळ्या सात तलावांना भेटी देण्यात येणार असून या माध्यामातून तलावांच्या अवस्थेवर दृष्टीक्षेप टाकता येणार आहे. वयोवृध्द तसेच कोणाला सायकल चालविता येत नसल्यास १० इलेक्ट्रोनीक सायकलची सोय करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेच आहे. सायकल रॅलीच्या माध्यामातून प्रदुषण टाळणे, इंधन बचतीचाही संदेश देण्यात येईल. स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला मासूंदा तलाव परिसरात दीप्रज्वलन करण्यात येणार आहे. मासुंदा परिसरात भारूड, नृत्य, युथ बँड यासांरख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक ठाणेकरांना यात्रेत सहभागी होण्याचे न्यासातर्फे करण्यात आले आहे. या स्वागतयात्रेत भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाचे पथक विस्मृतीत गेलेले खेळ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. विशेष १२ खेळांचे या महिला प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. यावेळी सुधाकर वैद्य, संजीव ब्रह्मे, अरविंद जोशी, डॉ. अश्विानी बापट आदी उपस्थित होते.