उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी आम्रपालीनगरातील सार्वजनिक शौचालयात गुरुवारी सकाळी ९ वाजता स्त्री जातीचे नवजात बालक मिळाले. बालकांवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आई विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरतील आम्रपालीनगर मधील सार्वजनिक शौचालयात नुकतेच जन्मलेले नवजात बालक एका पिशवीत गुंडालेल्या अवस्थेत काही महिलांना दिसले. नवजात बाळाची माहिती महिलांनी इतरांना दिल्यावर, बाळ बघण्यासाठी एकच गर्दी झाली. स्थानिक महिला व विठ्ठलवाडी पोलिसांनी बाळाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वसंतराव मोरे यांनी बाळाची नाळ बांधून संसर्ग होऊ नये म्हणून त्वरित उपचार सुरू केले.
बाळाचे वजन २ किलो १३० ग्राम असून तब्येत ठणठणीत आहे. बाळाची नळीवाटे दूध देण्यात येत असल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. तर दुसरीकडे विठ्ठलवाडी पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध सुरू केला असून अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केला. बाळाला त्वरित उपचार सुरू केल्याने, तब्येत चांगली आहे. बाळाच्या आईने कोणत्याही परिणामाची भीती न बाळगता बाळाचा स्वीकार करावा. असे नागरिकांचे म्हणणे आहे. नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीच्या बाळाला सार्वजनिक शौचालयात फेकून दिल्याने, बाळाच्या आईचा शोध पोलिसांनी घेऊन तीच्यावर सक्त कारवाईची मागणीही होत आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड तपास करीत आहेत.