संकलन : प्रज्ञा म्हात्रे यंदा १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. हे नवमतदार मतदानाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकाच्या बोलण्यातून उत्साहाची भावना दिसून येत आहे. हा क्षण सेल्फीमध्ये टिपण्याच्या भावना या मतदारांतून उमटत आहेत. त्यांच्या या प्रतिक्रिया...मतदानाचा प्रथमच अधिकार मिळाला आहे त्यामुळे एक जबाबदारी पडल्यासारखे वाटत आहे. योग्य उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. आता आणखीन नवीन हक्क मिळत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच पक्षांचा प्रचार पाहिला. या प्रचाराकडे एक अॅडव्हाण्टेज म्हणून मी पाहत आहे. या प्रचारात सांगितलेल्या योजना कितपत पूर्ण होतील, हे निवडून आल्यावरच समजेल. मतदान करण्याचा उत्साह अर्थातच आहे. मतदान केल्यावर एक सेल्फी तर नक्कीच काढणार.- शमिका देशपांडे मतदान करण्याचा खूप उत्साह आहे. माझ्या एका मतामुळे महापालिकेला नगरसेवक मिळणार आहे. १८ वर्षे पूर्ण होण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. कारण, मला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. काही प्रचार योग्य, तर काही ठिकाणी व्यवस्थित झाला नाही. काही प्रचारांत ध्वनिप्रदूषण झाले. काही उमेदवारांच्या प्रचारातील मुद्दे आवडले, ते तरुणांसाठी फायदेशीर आहेत. मी विकासाचा विचार करून मत देणार आहे. - वैदेही मुळ्ये यंदा चार उमेदवारांना मत द्यायचे आहे. माझ्या कुटुंबाला सहकार्य ज्याने केले, अशा सुशिक्षित आणि सुजाण उमेदवाराला मत देणार आहे. प्रचार तर सर्वच जण करतात, पण त्याचे मला विशेष काही वाटले नाही. मी विचार करूनच मतदान करणार आहे. मत देऊन उमेदवाराने काम केले नाही तर... असाही विचार मनात आहे. त्यामुळे मतदान करावे की नाही, या संभ्रमात आहे. - कौस्तुभ राऊतप्रथमच मतदान करण्याचा हक्क मिळाला, त्यामुळे आनंद आहे. हक्काचा उमेदवार मी माझ्या मतदानातून निवडून देणार आहे. सुरुवातीला इतरांना मतदान करताना बघत होतो. आता तो हक्क मला या वर्षी मिळतोय. जो चांगले शहर करेल आणि लोकांच्या समस्यांची जाणीव ठेवून त्या योग्य पद्धतीने सोडवेल, त्याला मत देणार. - सौरव गोलतकर मतदान करण्यासाठी मी फार उत्साही होतो आणि ती संधी मला यंदा मिळाली आहे. चांगले वाटत आहे. प्रचारात मी उमेदवारांनी दिलेली आश्वासने ऐकली आहेत. परंतु, जो उमेदवार मराठी माणसासाठी, त्याच्या समस्यांसाठी झटेल, त्यालाच मी मतदान करेल. पहिलेच मतदान असल्याचा क्षण सेल्फीमध्ये कैद करण्यास मात्र विसरणार नाही. - केतन मांजरेकर मतदान करणे, हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि हक्क म्हणूनच त्याकडे मी पाहत असल्याने इतका उत्साह मला वाटत नाही. पक्षांनी केलेले प्रचार मी भवितव्य म्हणून पाहिले नाही, तर तो एक प्रचार याच दृष्टीने पाहिले. मी हक्क म्हणून मतदान करणार आहे. - प्रांजली गोखले
नवमतदारांच्या भावना
By admin | Published: February 21, 2017 6:04 AM