संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्रातील ठाकरे बंधूंच्या समर्थकांनी परस्परांवर सुपारी, टोमॅटो, नारळ, शेण अशा वेगवेगळ्या खाद्य व त्याज्य पदार्थांनी मारा केल्यानंतर ‘भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?’ असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. ईर्षा व मत्सर या पायावर उभे राहिलेले पक्ष राजकारणात एकमेकांचे मित्रपक्ष होऊ शकत नाहीत; त्यामुळे दोन ठाकरे, दोन पवार आणि ठाकरे-शिंदे यांच्या दोन शिवसेना यांचे नाते विळ्याभोपळ्याचेच राहणार.
महाराष्ट्रात सध्या लढाई महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असताना, राज ठाकरे यांचा ‘मनसे’ खरे तर साइडिंगला टाकलेले ‘इंजिन’ आहे; परंतु, शनिवारच्या राड्याने मनसे विनाकारण चर्चेत आला. अर्थात ही चूक उद्धवसेनेच्या अतिउत्साही सैनिकांचीच. लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. त्या बदल्यात काही लाभ होईल, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिंदेसेनेकडील निशाणीवर लढावे, असा प्रस्ताव दिला गेला. त्यामुळे राज नाराज झाले व बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे झाले. आता २२५ ते २५० जागांवर उमेदवार उभे करण्याकरिता घराबाहेर पडलेल्या राज यांनी दौऱ्याकरिता मराठवाडा निवडला.
मराठवाड्याने उद्धवसेनेला बऱ्यापैकी साथ दिल्याने आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे करण्याचे बळ त्यांना प्राप्त झाले. राज यांचे मराठवाड्यात येणे उद्धवसेनेला रुचले नाही. मात्र, सोलापुरात राज यांनी सरसकट आरक्षणाला विरोध करून आपल्या काकांनी - बाळासाहेबांनी - २५ वर्षांपूर्वी घेतलेल्या भूमिकेची कास धरली. साहजिकच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी राज यांच्यावर तोफ डागली. धाराशिव येथे मराठा समाजातील आक्रमक तरुणांचा सामना राज यांना करावा लागला. मुदलात राज-जरांगे यांच्यात सामना रंगला असताना, इकडे उद्धव ठाकरे हे आपले राजकीय शत्रू देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना तिखट भाषेत लक्ष्य करीत होते.
मराठवाड्यातील उद्धवसेनेच्या सैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या लढाईत आपला शत्रू नेमका कोण, याचा नेमका संदेश न पोहोचल्याने म्हणा किंवा नेत्यांची मर्जी जिंकण्याकरिता काहीतरी वेगळे करण्याच्या हौसेपोटी शुक्रवारी बीडमध्ये त्यांनी राज यांच्या मोटारीवर सुपाऱ्या फेकून ‘सुपारीबाज’ अशी घोषणाबाजी केली. राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या मनसेला ही ‘चमकायची सुपारी’च लाभली.
ठाण्यातील सभेकरिता उद्धव आले असताना, मनसैनिकांनी टोमॅटो, नारळ, शेण फेकून सव्याज परतफेड केली. कालपरवापर्यंत टोमॅटोने शंभरी गाठली होती, तेव्हा ही चैन मनसैनिकांना परवडली नसती. श्रावणात नारळाला मागणी असते, तो महाग होतो. त्यामुळे नारळ फेकणे हेही चैनीचेच लक्षण आहे. एकेकाळी पुण्यातील अभिजनांनी स्त्रीशिक्षण देणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाईंना शेण मारले होते. आता सांस्कृतिक नगरी ठाण्यात मनसैनिकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा पुरोगामी वारसा सांगणाऱ्या त्यांच्या नातवाला शेण मारले. त्यातून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आली, तर मनसे राहिली दूर महायुतीच्या नेत्यांना कपाळाला हात लावून बसावे लागेल. आमच्या प्रकारानंतर ही शक्यता जास्त वाढली आहे.
राहता राहिला बांगड्या फेकण्याचा प्रकार, तर अनेक राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांनीही बांगड्यांचे आहेर देऊन ‘महिलांना कमकुवत, अबला ठरवू नका,’ असा इशारा अनेकदा दिला आहे. आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या पुरुषांनाही देताना लाज वाटेल अशा शिव्या, टीव्ही कॅमेऱ्यांसमोर देत असताना, त्यांना बांगड्या उधळण्यास भाग पाडणे हा अन्याय आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ‘गडकरी’बाहेरील हल्ल्याचा, राज यांचा उल्लेखही केला नाही. आपण राज आणि अशा आंदोलकांना काडीचेही महत्त्व देत नाही, हेच उद्धव यांनी दाखवून दिले आहे, जे पुरेसे बोलके आहे. मग ‘भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं ? सुपारी, टोमॅटो, नारियल मारने के लिए तो बनाई है,’ असेच या सर्व तमाशाबद्दल म्हणावे लागेल.