कल्याण : शहरात ७० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उषा पांडुरंग केतकर (वय ९६) यांना मानव साहाय्यक सेवा मंडळातर्फे गुरुवारी ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेला हा सन्मान त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा ठरला.
केतकर आजी या महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या उत्तम उदाहरण आहेत. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते टिळक चौकात केतकर यांना २१ हजारांचा धनादेश सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर वैजयंती घोलप, सभागृह नेते प्रकाश पेणकर, समाजसेवक प्रकाश मुथा, पत्रकार तुषार राजे, ठाणे पत्रकार विक्रेता संघाचे प्रमुख दत्ता तेली, दिनेश सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
मानव साहाय्यक सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकर आव्हाड, सचिव अम्मार काझी, गिरीश लटके, कोषाध्यक्ष संजय वाजपाई, प्रा. महेंद्र भावसार, राजू गवळी, दामू काबरा, रमेश करमरकर, प्रशांत म्हात्रे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
फोटो : १५ कल्याण-उषा केतकर
--------------------