अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने मंगळवारी २२ नागरिकांना उघड्यावर प्रातर्विधीस बसले म्हणून कारवाई करत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. बुधवारी एकूण सात जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या सात जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. मात्र, पालिकेच्या या मोहिमेमुळे उघड्यावर प्रातर्विधीसाठी बसणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शहर हगणदारीमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहेत. पालिकेने सुविधा पुरवल्यानंतर नागरिकांनी उघड्यावर प्रातर्विधीस जाऊ नये, अशी अपेक्षा पालिका व्यक्त करत होती. तरीदेखील, अनेक नागरिक उघड्यावर जात असल्याने पालिकेच्या भरारी पथकाने या सर्व नागरिकांना ताकीद देत सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्याचा सल्ला दिला. सतत कारवाई करूनही नागरिकांची ही सवय मोडत नसल्याने अखेर कायदेशीर बाब म्हणून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम भरारी पथकाने सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी २२, तर दुसऱ्या दिवशी ७ नागरिकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारची कारवाई रोज होणार आहे. बुवापाडा भागात सर्वाधिक नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसत असल्याने त्याच ठिकाणी पालिकेने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशीही धरपकड सुरूच
By admin | Published: February 16, 2017 1:56 AM