ठाणे : दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करताना गणेशभक्तानी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशी विनवणी केली. पुढच्या वर्षी मात्र गणपती बाप्पाचे आगमन १२ दिवस अगोदर शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. यावर्षी गणपतीचे आगमन मंगळवारी झाले तर पुढील वर्षी अनंत चतुर्दशी मंगळवारी असेल असेही सोमण म्हणाले.
मंगळवारी ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाचे वाजगत गाजत आगमन झाले. बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची तयारी सुरू झाली. साश्रुनयनांनी बाप्पाला निरोप दिला जात होता.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाचे विसर्जन सुरू होते. खरोखरच बाप्पा पुढील वर्षी लवकर येणार आहे असे सोमण यांनी सांगितले. यंदा श्रावण अधिक मासामुळे बाप्पाचे आगमन १९ दिवस उशीरा म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ रोजी झाले होते. तसेच, यंदा गौरी गणपतीचे विसर्जनही पाच दिवसांवरच आले आहे. गौरी विसर्जन पुढील वर्षी गुरूवार १२ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच सहाव्या दिवशी आहे, असे सोमण यांनी सांगितले. अनंत चतुर्दशी यंदा २८ सप्टेंबर २०२३ रोजी तर पुढील वर्षी मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ रोजी असेल. अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशी असेल.