ठाणे : या वर्षातीलील शेवटचे चंद्रग्रहण पाहिल्यानंतर लोकांमध्ये ग्रहणांविषयी खूप कुतुहल निर्माण झाले आहे. पुढच्या वर्षी सन २०२३ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की, गुरुवार २० एप्रिल २०२३ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आणि शनिवार १४ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत. परंतु शुक्रवार ५ मे २०२३ रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि शनिवार २८ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहेत.
एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ ब्ल्यू मून‘ म्हणतात. पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये १ ॲागस्ट आणि ३१ ॲागस्ट रोजी पौर्णिमा येत आहेत. त्यामुळे ३१ ॲागस्ट रोजी ‘ ब्ल्यू मून‘ योग येणार आहे असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.