जितेंद्र कालेकर
ठाणे: मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोघांकडून एकमेकांशी निगडीत प्रकरणांची चौकशी सुरू आहे. एनआयएने ठाण्यातील हिरेन यांचे दुकान असलेल्या वंदना सिनेमासमोरील दुकानांच्या परिसरातील अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. तर एटीएसने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या हत्येबाबतचा घटनाक्रम उभा (रिक्रिएशन ऑफ सीन) करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या मुंबईतील अंटालिया’ इमारतीजवळ मिळालेल्या मोटारकारमधील स्फोटकांचा तपास एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकांकडून सुरू आहे. तर स्फोटके ठेवलेल्या मोटारकारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई एटीएसकडून सुरू आहे. याच प्रश्नावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची कुरघोडी करीत आहेत. गुरुवारी एनआयएच्या पथकाने ठाण्यातील ‘विजय पाम्स’ या इमारतीमधील हिरेन कुटुंबीयांची दुपारी तब्बल तीन तास चौकशी केली.
या दरम्यान, त्यांच्याकडून अनेक शक्यता आणि आरोपांबाबतची पडताळणी केली. मात्र, या चौकशीतील तपशिलाची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शुक्रवारी (१२ मार्च) ठाण्यातील हिरेन यांचे क्लासिक मोटर्स हे दुकान असलेल्या वंदना सिनेमासमोरील दुकानांबाहेरील सीसीटीव्हींची पडताळणी त्यांनी केली. १ जानेवारी ते ५ मार्च २०२१ या काळात या दुकानामध्ये कोण कोण आले? संबंधित मनसुख यांच्याकडे असलेली ही स्कॉर्पिओ मोटार त्या ठिकाणी किती वेळा आली? कोण घेऊन आले? याची तपासणी केली. त्याचबरोबर एटीएसच्या एका पथकाने सलग तिसऱ्या दिवशी मनसुख यांची पत्नी विमला, मुलगा मित आणि भाऊ यांच्याकडे या हत्येशी निगडीत काही महत्त्वपूर्ण माहिती घेतल्याचे सांगण्यात येते.
मनसुख यांच्या वजनाचा पुतळा फेकला खाडीतएटीएसच्या अन्य एका पथकाने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही मच्छीमार, हवामानखात्याचे काही कर्मचारी, न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी पुन्हा भेट दिली. मनसुख यांच्या वजनाचा पुतळा मुंब्रा रेतीबंदर खाडीत फेकून तो कोणत्या दिशेने जातो, पाण्याचा प्रवाह कुठे जातो, याची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मास्कभोवती मिळालेल्या रुमालांचे गौडबंगाल काय?मनसुख यांचा मृतदेह आढळला तेेव्हा त्यांच्या तोंडाला असलेल्या मास्कच्या आत काही रुमाल होते. त्याचा उल्लेख एटीएसच्या अधिकाऱ्याने पंचनाम्यात करून मृतदेह काढतेवेळी ज्यांनी ते रुमाल पाहिले, त्यांची नव्याने चौकशी केल्याचे समजते. या रुमालांचे काय गौडबंगाल आहे? याचाही उलगडा आता एटीएसच्या पथकाला करावा लागणार आहे. मृतदेह काढतेवेळी रुमाल काढतांनाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओचीही पुन्हा पडताळणी केली जात असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.