ठाणे : एनआयएने ठाण्यातील साकेत सोसायटीत राहणारे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निवासस्थानाची बुधवारी झडती घेतली. त्यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे चार ते पाच तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-६ इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा अनेक बाजूंनी वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते. चार तासांची घरझडती, कागदपत्रे पडताळणी, चौकशीनंतर तेथे राबोडी पोलिसांना बाेलावले. सोसायटीतील काही रहिवाशांकडेही चौकशी केली. बुधवारी रात्री आठच्या सुमारास एनआयएचे मुंबईतील एक पथक वाझेंना घेऊन त्यांच्या निवासस्थानी आले होते. अवघ्या अर्ध्या तासांच्या चौकशीनंतर ते वाझेंना घेऊन सोसायटीबाहेर पडले. वाझेंच्याच सीआययू युनिटने सोसायटीतील सीसीटीव्हीतील चित्रण पत्र देऊन ताब्यात घेतले होते. त्यावेळी अशा कोणत्या घडामोडी झाल्या, याचीच विचारणा यावेळी वाझेंकडे पथकाने केली.
एनआयएने घेतली वाझेंच्या ठाण्यातील घराची झडती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 5:43 AM