ठाणे : परदेशात नोकरीचे अमिष दाखवित वेगवेगळया कारणांसाठी लोकमान्यनगरातील एका वयोवृद्धाकडून ३६ लाख रुपये उकळणा-या अलादे ओलुवासेगुन (५५, रा. नालासोपारा, पालघर) या नायजेरियनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेल पथकाने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील रहिवाशी बळवंत रानडे (६८) यांचा मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेला आहे. त्यामुळे आपणही परदेशात नोकरी करुन मुलासोबतच वास्तव्य करु, असा विचार बळवंत यांचा होता. त्यातच त्यांना लारसन आरनेस्टो, थॉमस, कॅनिथ शरमन, जेस्का नामिरो आणि अलादे आदी नायजेरियन नागरिकांनी पालघर तसेच वेगवेगळया ठिकाणांहून फोन करुन रानडे यांना अमेरिकेत स्टोअर किपरची नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. आपल्यालाही मुलासोबतच राहता येईल, या विचाराने ते या नोकरीसाठी तयारही झाले. याचाच फायदा उचलून २७ जून २०१७ ते २३ आॅगस्ट २०१७ या कालावधीत या टोळक्याने अमेरिकन व्हीजा स्टॅपिंग आणि इतर क्लिअरन्स करण्याच्या नावाखाली रानडे यांच्याकडून जनकल्याण सहकारी बँक (मुलूंड), नॉर्थ कॅनरा जीएसबी बँक (मुलूंड), स्टेट बँक आॅफ इंडिया (मुलूंड), आणि एचडीएफसी बँक (मुलूंड) या बँकांच्यामार्फत ३६ लाख पाच हजार ५०० रुपये उकळले. त्यांना नोकरीही न देता या फसवणूक केल्याप्रकरणी रानडे यांनी १४ मार्च २०१८ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. सावंत यांच्या पथकाने अलादे या नायजेरियनला नालासोपा-यातून बुधवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह, सिमकार्ड राऊटर आणि डोंगल आदी सामुग्री हस्तगत करण्यात आली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव हे याप्रकरणी तपास करीत आहेत. यातील फरारी आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
परदेशात नोकरीचे अमिष दाखवून ३६ लाखांची फसवणूक करणा-या नायजेरियनला नालासोपा-यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 7:59 PM
अमेरिकन व्हीसा स्टॅपिंगसाठी तसेच इतर क्लिअरन्सच्या नावाखाली ३६ लाखांची लूट करणा-या पाच जणांपैकी एका नायजेरियनला ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देपाच जणांच्या टोळीने केली फसवणूकअमेरिकन व्हीजा स्टॅपिंगसाठी पैशांची मागणीइतर चौघा जणांचा शोध सुरुच