ठाणे: मीरारोड परिसरातून मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या सॅटर्डे बिलीव्ह ओकाम या 28 वर्षीय नायजेरियन महिला ठाणे गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिच्याकडून 5 लाख 63 हजार रुपये किंमतीचे 56.3 ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त करण्यात यश आले आहे.
ठाण्यातून जाणाऱ्या घोडबंदर रोडमधील गायमुख खाडीवरील गणेश विसर्जन घाट गेटजवळ एक नायजेरियन महिला एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकातील पोलीस हवालदार हरीश तावडे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी सापळा रचून त्या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. त्यावेळी तिच्याकडून 56.3 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आली.
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर त्या महिलेला अटक केली. तिने हे अमंली पदार्थ कुठून आणले आणि ती कोणाला विक्री करण्यासाठी आली याचा शोध सुरू आहे. तर याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी करीत आहेत.