भिवंडी ( दि. १९ ) भारतात छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना एका टेक्सस्टाईल कंपनीवर छापा मारून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सलीम अमीन शेख( ३०), रासल अबुल हसन शेख (२७), मो.शाहीन मोहम्मद अकबर अली शेख (२४), मोहम्मद मासुम शोयदुल्ला इस्लाम(२१), तरुणमणीराम त्रिपुरा (२१), सुमनमनीराम त्रिपुरा (२१), इस्माईल अबुताहेर खान (१९), आजम युसूफ खान (१९), मोहम्मद आमीर अबुसुफियान (२६) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि, बांगलादेशी नऊ नागरिकांनी भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे येवून रेल्वेने प्रथम कल्याण व नंतर भिवंडीतील सरवली येथे येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहून अवनी टेक्सटाईल्स कंपनीत काम करीत असल्याची खबर दिली. त्यांनतर भिवंडी गुन्हे शाखेने टेक्सटाईल छापा टाकला असता हे ९ बांग्लादेशी नागरिक कामगार म्हणून आढळून आले आहे. या कारवाई दरम्यान या नऊ जणांनी बनावट पॅन कार्ड व आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पास बूक मिळवून ते शासनास खरे असल्याचे भासवून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.
या नऊ बांगलादेशींना कोनगाव पोलिसांच्या ताब्यात देऊन शुक्रवारी दुपारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोऊनि एन.बी.गिरासे करीत आहेत. बांगलादेशी नागरिकाच्या अटकेने भिवंडीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.