ठाणे : एकीकडे राज्यातील पुणे आणि नाशिक शहरांत वाहने पेटवून देण्याचे प्रकार घडले असतानाच ठाणे शहरातही हे लोण पसरल्याने संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरील गणेशवाडीमध्ये नऊ मोटारसायकलींना आगी लावण्याचे प्रकार घडले. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वर्षभरापूर्वी नौपाड्यात अंतर्गत वादातून एका रिक्षासह पाच वाहने जाळण्यात आली होती. यात तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वागळे इस्टेट, कोपरी आणि ठाणे रेल्वेस्थानक भागातही असेच मोटारसायकली जाळपोळीचे प्रकार घडले होते. गुरुवारी पाचपाखाडीतील कौशल्या हॉस्पिटलजवळ पहाटे २ ते ३ च्या सुमारास पुन्हा हा प्रकार घडला. यामध्ये सुरेखा अहिरे, अमित खापरे, चंद्रकांत जोशी आणि संतोष भोईर आदी नऊ जणांच्या दुचाकींना लक्ष करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दलाने या दुचाकींना लागलेली आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्यामुळे पेटलेल्या वाहनांच्या बाजूला असलेल्या दुचाकी आणि काही कार सुरक्षित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरु वारी पहाटे २ वाजताच्या दरम्यान एक दुचाकी जळत असल्याची माहिती पाचपाखाडी भागातील एका रहिवाशाने पाचपाखाडी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर, घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात नऊ दुचाकी जाळल्या, आरोपींचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 12:58 AM