ठाणे : कोरोना आणि ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच ठाणे शहरात कोरोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ चे नऊ रुग्ण आढळल्याची बाब एका चाचणी अहवालातून स्पष्ट झाली आहे. त्यातच शहरात स्वाईन फ्ल्युचे महिनाभरात ५७ रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ठाणे शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली.
पहिल्या आठवड्यापर्यंत दररोज पाचशेच्या आत कोरोनाच्या चाचण्या केल्या होत्या. या चाचण्यांच्या संख्येत पालिकेने वाढ केली आहे. आता दररोज दोन हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. शहरात आतापर्यंत ४४७ रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत २४६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी २२१ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १४ तर खासगी रुग्णालयात ११ रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज ५० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून आतापर्यंत तिघांचा मृत्यु झाला आहे.
त्याचबरोबर ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचेही रुग्ण शहरात आढळले आहेत. या आजाराचे २४ रुग्ण मार्च महिन्यात आढळून आले आहेत. त्यातच कोरोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ चा शिरकाव झाला असून या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळल्याची बाब जनुकिय क्रमनिर्धारण चाचणी अहवालातून पुढे आली. तसेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत २१९ स्वाईन फ्ल्युचे रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ रुग्ण हे मार्च महिन्यात आढळले आहेत. या तिन्ही आजारांच्या वाढत्या संसर्गामुळे शहराच्या आरोग्य चिंतेत वाढ झाली आहे. इंफो मार्च महिन्यात आढळलेल्या ३२ रुग्णांचे नमुने ठाणे महापालिकेने पुणे येथे जनुकिय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ९ रुग्णांना करोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी १.१६’ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झालेले आहेत. उर्वरित २३ रुग्णांच्या चाचणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.