ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 02 - शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणातील फरारी असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह नऊ मारेकऱ्यांच्या खारघर भागातून कारसह मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. जमिनीच्या वादातून हा जीवघेणा प्रकार घडला असून यातील आणखी पाच जणांचा शोध सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केणे कुटुबीयांना श्रीराम भगत यांची डोंबिवलीतील आयरे गावातील जमीन विकत हवी होती. ती देण्यास भगत कुटुंबीयांचा विरोध होता. यातूनच उद्भवलेल्या वादातून विक्रांत यांचा मंगेश याने श्रीराम यांच्या सांगण्यावरुन रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून खून केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी श्रीराम भगतसह नऊ जणांना एका कारसह अटक करण्यात आली आहे. श्रीराम भगत (४६), मंगेश भगत (२७), ओंकार भगत (२१), शुभम भगत (१९), पंकज म्हात्रे (२१), प्रदीप नायडू (२४), संजय तुळवे (२०), प्रशांत पवार (२०) आणि शशीकांत उर्फ शशी शांताराम कुळे (२४) रा. सर्व आयरे गाव, डोंबिवली अशी अटक केलेल्या कथित आरोपींची नावे आहेत. यापूर्वी यांच्यापैकी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. मारेकरी हे केणे कुटुंबीयांच्या शेजारीच वास्तव्याला आहेत. भगत कुटुंबीयांना जमीन विकायची नसल्यामुळे ते आयरे गावातील त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी जेसीबीने सफाई करीत होेते. त्याचवेळी ३० मे २०१७ रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास श्रीराम यांनी त्याठिकाणी उभा केलेला जेसीबी बाजूला घेण्यास सांगितल्याचा तसेच दोन दिवसांपूर्वी झाडे तोडण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन श्रीरामसह इतर १५ ते १६ जणांनी सचिन आणि विक्रांत केणे या दोघा भावांसह त्यांच्या नातेवाईकांना घेराव घातला. या धुमश्चक्रीत श्रीराम यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर काढून पुतण्या मंगेशकडे दिले. श्रीरामच्या इशाऱ्यावरुनच मंगेशने विक्रांतच्या पोटावर गोळीबार केला. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. डोंबिवली पोलीसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु असतांना मारेकरी भगत कुटुंबीय हे गोव्यात पळून जाणार असल्याची पक्की माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वाय. एस. चव्हाण यांच्या पथकाने तळोजा रोड मुरबी गाव, कोपरा घरकूल येथे १ जून रोजी सापळा लावून एका कारमधून सायंकाळी ७.१० वा. च्या सुमारास त्यांना पकडले. त्यांची कार खारघर रस्त्याने येत असतांना दिसल्यानंतर पोलिसांनी या कारला अडवून चौकशीअंती या नऊ जणांना अटक केली. या आरोपींना आता डोंबिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.आणखी पाच जणांचा शोध सुरुया प्रकरणातील नऊ जणांचा शोध लागला असून आणखी चार ते पाच फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर ते शेजारच्या जिल्हयात पसार झाले होते. त्यांच्या गाडीच्या मागावरच पोलीस होते. अखेर गाडीसह त्यांना ताब्यात घेण्यात आले असून हत्येसाठी वापरलेल्या मंगशचे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचाही शोध सुरु असल्याचे रानडे यांनी सांगितले.
आता शस्त्र परवान्यांचा सर्व्हे करणारडोंबिवलीतील या घटनेमुळे आता शस्त्र परवाना असलेल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली भागातील वादग्रस्त परवानाधारकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यातूनही आवश्यकता वाटल्यास संबंधितांच्या परवान्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मकरंद रानडे यांनी स्पष्ट केले.