भिवंडी तालुक्यातील पडघा जवळ असलेल्या वाशेरा गावातील एका कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या नऊ कामगांरांना विद्युत वाहिनाचा शॉक लागल्याने कामगार गंभीर जखमी झाल्याची शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यत या घटनेबाबत पडघा पोलीस ठाण्यात नोंद केली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी आसून त्यांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजेचा धक्का लागून नऊ कामगार गंभीर घटना घडून ४० तास उलटून देखील याप्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसंत चिबडे, अनंत भोरे, हितेश भोरे, सुनील भोरे, विशाल रानडा , दिनेश वाघ राहणार दाभाड, अनंत दिवे ,विशाल भोईर व अजय निखंडे असे जखमी कामगारांचे नाव आहे. हे सर्व कामगार भिवंडी तालुक्यातील एका कंपनीच्या गोदामात शनिवारी सकाळच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या हातून धातूची शिडी कंपनीतील उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यात ते फेकले गेले. यावेळी काही कामगार भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक कार्यक्रते अशोक सापटे यांनी दिली.तर पोलिसांनी घटनेची नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे जखमीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पीडित कामगारांचे जबाब नोंदविण्यासाठी आम्ही पोलिस पथक पाठवले आहे. अशी माहिती पोलीसांकडून मिळाली आहे.