ठाणे - कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक येत्या २५ जून रोजी लागली आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये उडी घेतली आणि राष्ट्रवादीचे गणित फिस्कटले. त्यामुळे आता डावखरे यांना टक्कर देण्यासाठी ठाण्यातून नजीब मुल्ला यांनी निवडणुक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी मतदार नोंदणीच्या कामाला सुरवात केली आहे. मुल्ला यांनी तिकीट मिळाल्यास ही निवडणुक भाजपासाठी अवघड झाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतून देखील संजय मोरे यांचे नाव जवळ जवळ निश्चित मानले जात आहे.
२५ जुन रोजी कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक लागली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळेस डावखरे यांना २७ हजार, केळकर यांना २२ हजार मते पडली होती. तर मनसे पुरस्कृत निलेश चव्हाण यांना ३ हजार मते पडली होती. त्यानंतर चव्हाण यांनी मनसेतून भाजपामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा कोकण पदवीधरसाठी मोर्चे बांधणी सुरु केली होती. तसेच शहर अध्यक्ष संदीप लेले यांना देखील आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी देखील मतदार नोंदणी करुन संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. परंतु ऐन वेळेस निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून हातात भाजपाचे कमळ घेतल्याने या चव्हाण आणि लेले यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे लेले हे प्रचंड नाराज झाले असून आम्ही काय नुसती उष्टी भांडीच घासायची असा सवाल उपस्थित करुन पक्षाला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच या दोघांच्या नाराजीमुळे त्याचे परिणाम या निवडणुकीवर हमखास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील हालचाली सुरु केल्या असून चित्रलेखा पाटील यांचे नाव आघाडीवर आले होते. परंतु डावखरे यांना धडा शिकविण्यासाठी आता नजीब मुल्ला यांचे नाव देखील या निमित्ताने आघाडीवर आले आहे. मुल्ला हे कोकण मर्चंट बँकेचे चेअरमन असल्याने त्यांचा कोकणाशी थेट संपर्क आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो आणि त्यांचे पक्षातील आणि इतर पक्षातील राजकीय मंडळींशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्यावर पक्ष विश्वास टाकू शकतो असा कयासही लावला जाऊ लागला आहे. परंतु मुल्ला यांनी मात्र हे शिवधनुष्य पेलण्याची तयारी सुरु केली असून बुधवार पासूनच त्यांनी मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ठाण्यातील त्यांचे सर्व सहकारी देखील कामाला लागले असून बँकेच्या शाखांचा माध्यमातून त्यांनी कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत व्हॉट्सअॅप द्वारे मॅसेज टाकून तेथील कार्यकर्त्यांना देखील तयारी करण्यास सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतु असे असले तरी पक्ष त्यांच्यावर विश्वास टाकणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आधीच त्यांचे नाव परमार केस मध्ये असल्याने पक्षाकडून त्यांच्यावर शिक्कामोर्तब होईल का? याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी मुल्ला हेच डावखरे यांना टक्कर देऊ शकतात अशी चर्चा देखील राष्ट्रवादीत रंगू लागली आहे. शिवसेनेने देखील रत्नागिरीतील भाजपाचे पदाधिकारी विनय नातून यांना गळ घातल्याची चर्चा असली तरी देखील संजय मोरे या निष्ठावान शिवसैनिकावर पक्ष विश्वास दाखविण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे हे तीघे जर एकमेकांसमोर उभे ठाकले तर हे तीनही उमदेवार ठाण्यातील ठरणार असून त्यांच्यात काटेंकी टक्कर होईल हे मात्र निश्चित मानले जात आहे.नवी मुंबई निर्णायक ठरणारराष्ट्रवादीने जर मुल्ला यांच्यावर विश्वास दाखविला आणि त्यांना तिकीट दिले तर यामध्ये नवी मुंबईची भुमिका ही निर्णायक ठरणार आहे. मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक मानले जातात आणि आव्हाड आणि नाईक हे राष्ट्रवादीची दोन टोके मानली जात आहेत. त्यामुळे नाईक फॅमीला मुल्लांना सहकार्य करणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.