ठाणे : प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभुमीवर प्लास्टिक व थर्मोकॉल हद्पार झाल्यानंतर यावर्षीचे निर्माल्य खरया अर्थाने निर्मल झाल्याचे पहायला मिळत आहे. समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिकेने आठ वर्षांपुर्वी सुरू केलेल्या अभिनव उपक्रम याहीवर्षी राबविला गेला यंदा दिड, पाच, सात व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनात जवळपास ६५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. यंदा अविघटनशिल पदार्थांचे प्रमाण ५० टक्कयापेक्षा जास्त कमी झाल्याने शुध्द व निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित झाले आहे
तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहराला जलप्रदुषणातुन मुक्त करण्यासाठी आठ वर्षांपुर्वी ठाणे महानगरपालिकेने कृतिम तलाव व निर्माल्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापनाचा उपक्रम समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातुन सुरू केला. पहिली तीन वर्षे भाविकांच्या धार्मिक श्रध्दांना नाजुकपणे हाताळत असतांना प्रसंगी अनेक अप्रिय घटनांना संस्थेच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागले. मात्र निर्माल्यापासुन तयार झालेले खत गणेशभक्तांना व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष व सचिवांना वाटप करण्याचा जाहिर कार्यक्रम करणे,विविध सोसायटीमध्ये निर्माल्यापासून तयार झालेल्या खताचे स्टॉल जनजागृती म्हणून लावणे, याबरोबर हर बार इको त्योहार सारखे लोकजागृती सारखे उपक्रम राबविल्यामुळे आता आठ वर्षांनंतर गणेशोत्सव काळातील निर्माल्य संकलनाला शिस्तबध्दता व लोकसहभाग असे दोन्ही आयाम प्राप्त झाले आहेत. ठाणे शहरातील मासुंदा, कळवा, विटावा, खारेगांव, रायलादेवी, वृंदावन, उपवन, रेवाळे, मिठबंदर, कोलशेत येथील तलाव, खाडी व कृत्रिम तलाव परिसरात पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा भाग म्हणून निर्माल्य संकलन केले जाते. भाविकांच्या घरातील गणशोत्सव काळातील किमान निर्माल्य दरवर्षी संकलित केले जाते. यंदा गणपतीच्या काळात जवळपास ६५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले यावर्षी अविघटनशिल पदार्थाचे प्रमाण ५० टक्यांपेक्षा जास्त घटल्याने निर्माल्य संकलन व वर्गीकरणाचे काम तुलनेने अधिक सोपे झाले प्लास्टीकच्या पिशव्यांचे प्रमाण ६० टक्के तर थर्माकॉलचे प्रमाण १०० टक्के कमी झलेले पहायला मिळाले ठाणे शहराचा हा निर्माल्य व्यवस्थापन पॅटर्न आता महाराष्ट्रातील १२ ज्योर्तिलिंगावरील धार्मिक स्थळी अवलंबिला जाणार आहे. याचबरोबर नाशिक व उजैन येथील कुंभमेळात देखील या पॅटर्नच्या आधारावर निर्माल्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. केवळ गणपती उत्सवापुरते हा उपक्रम मर्यादित न राहता गेल्या पाच वर्षांपासुन वर्षभर ठाणे शहरातील मंदीर, स्मशानभुमी, गृहनिर्माण संस्था व फुल बाजार येथील रोज निर्माण होणारे ४ टन निर्माल्य संकलित करून त्यापासुन उत्तम दर्जाचे सेंद्रीय खत तयार केले जाते. या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच गुड गर्व्हनन्स पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. वर्षाकाठी जवळपास २ हजार टन निर्माल्यावर या प्रकल्पाच्या माध्यमातुन प्रक्रिया केली जाते. प्लास्टीक व थर्माकोल बंदीच्या पार्श्वभुमीवर यंदा निर्माल्यात अविघटनशिल पदार्थांचे प्रमाण अत्यल्प प्रमाणात आढळून आले. सजावटीत देखील प्लास्टीकचा वापर कमी झाल्याने यावर्षी संकलित झालेले निर्माल्य तुलनेने अधिक शुध्द व निर्मळ असल्याची माहिती हा प्रकल्प गेली आठ वर्षे राबवित असलेल्या समर्थ भारत व्यासपीठाकडून मिळाली. सातत्यपूर्ण पाठपुरावा लोकजागरणामुळे ठाणे शहरातील तलाव व खाडी यांच्या जलप्रदुषणाला यामुळे मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.