उल्हासनगर : कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील संच्युरी रेयॉन कंपनीत सकाळी सव्वा अकरा वाजता नायट्रोजन गॅस टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू तर २ जण गायब झाले. तर ६ जण जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली आहे. स्फोट झालेल्या टँकर ठिकाणी मानवी मासांचा सडा पडल्याचे भयानक चित्र होते.
उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरात संच्युरी कंपनीतील एका प्लॅन्ट मध्ये सकाळी सव्वा अकरा वाजता गुजरात येथून आलेला नायट्रोजन गॅसचा टीएच-०४, जीएस-२४८७ क्रमांकाचा टँकर हा कंपनी प्लँट मधील कार्बनडाय सल्फर मध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा जबरदस्त होता की, संपूर्ण परिसर हादरला गेला. स्फोटात टँकर वरील चालक पवन यादव व प्लॅन्ट येथील हेल्पर अनंत डिंगोरे हे मिसिंग दाखविण्यात आले. तर शैलेश यादव व राजेश श्रीवास्तव या दोघांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात स्फोट झालेल्या टँकर ठिकाणी मानवी मासांचा सडा पडल्याने, मिसिंग दाखविण्यात आलेल्या दोघांचा मृतदेह यामध्ये असावा. असा संशय व्यक्त होत आहे. स्फोट झालेल्या टँकर शेजारी युरेका कंपनीचा टँकर वाहनचालक पंडित लक्ष्मण मोरे व क्लिनर हंसराज चरोत यांच्यासह संच्युरी कंपनीचे सागर झालटे, अमित भरनुके, प्रकाश अनंत निकम व मोहम्मद अरमान असे सहा जण जखमी झाले आहेत.
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी संच्युरी कंपनीतील स्फोटातील मृत्यू व जखमी बाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहेत. तर संच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी कंपनीच्या स्फोटात दोघांचा मृत्यू तर २ जण मिसिंग दाखविले असून ६ जण जखमी असल्याचे म्हटले आहे. तसेच मृत्यू झालेल्याच्या कामगारांना तर जखमी कामगारांना मदत देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. टँकर स्फोटाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही ललका यांनी म्हटले. आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह भाजपचे शहाराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, नाना बागुल यांच्यासह स्थानिक नेत्यांनी जखमींची चौकशी केली. कामगार नातेवाईक व नागरिकांची गर्दी कंपनीत स्फोट झाल्याची माहिती कामगारांच्या नातेवाईकाला मिळाली. तेंव्हा त्यांनी व स्थानिक नागरिकांनी कंपनी प्रवेशद्वार व रुग्णालयात गर्दीकेली होती.