- अजित मांडके, ठाणे ठाणे शहराची ओळख ही तलावांचे शहर म्हणून होती. परंतु,आता ती ओळख पुसली जात असून शहरात ६५ ऐवजी केवळ ३५ तलावाच शिल्लक राहिले आहेत. मात्र, या तलावांची निगा, देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. विशेष म्हणजे लोकमतने आपल्या काहीतरी कर ठाणेकर मोहिमेंतर्गत उर्वरित नामशेष झालेल्या त्या ३० तलावांचे काय झाले, ते कुठे होते, याची कोणतीही माहिती अथवा डेटा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अथवा स्थावर मालमत्ता विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. हे तलाव कसे बुजले, कोणी बुजविले याचेही उत्तरही महापालिकेकडे नाही.पूर्वी ठाणे शहरात ६५ तलाव होते. परंतु,आजच्या घडीला शहरात केवळ ३५ तलाव शिल्लक राहिले आहेत. यातील ब्रम्हाळा, उपवन, कचराळी, मासुंदा आणि आंबेघोसाळे याच तलावांवर पालिका दरवर्षी लाखोंची उधळपट्टी करीत आहे. परंतु, ही नैसर्गिक संपत्ती जोपासण्यासाठी महापालिकेकडून फारसे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. ६५ तलाव ही ठाण्याची ओळख होती, परंतु त्यातील ३० तलावांचे काय झाले असा सवाल आता ठाणेकर उपस्थित करु लागले आहेत. जे जुने जाणकार ठाणेकर आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार आज त्या तलावांच्या ठिकाणी झोपडपट्टींचा विळखा बसला असून, काही ठिकाणी इमारती उभ्या आहेत. एक तलाव तर महापालिकेनेच गिळंकृत केला आहे. (उर्वरित पुढील पानावर)स्थावरकडे त्या तलावांची यादीच नाही...प्रदूषण नियंत्रण विभागाकडे या नामशेष झालेल्या तलावांची माहिती मागितली असता, ती उपलब्ध नसल्याचे सांगून ती स्थावर मालमत्ता विभागाकडे मिळेल असे सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात स्थावर मालमत्ता विभागाकडे विचारणा केली असता, ही माहिती प्रदूषण नियंत्रण विभागाकडे असायला हवी असे उत्तर देण्यात आले. माहिती जुनी असल्याने ती आता सापडणेही कठीण असल्याचे या विभागातील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाचे दुर्लक्षमहापालिकेच्या नियोजनाअभावी आणि त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच आज तलाव नामशेष झालेले आहेत. किंबहुना ते बुजविण्यामागे राजकीय वरदहस्तही जबाबदार असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. तलावांचे संवर्धन करावे हा दृष्टीकोनच प्रशासनाकडे नसल्याने अस्तित्वात असलेल्या तलावांचेही आकारमानही घटत चालले आहे. दूरदृष्टीचा अभावविहीर अथवा तलाव हे नैसर्गिक असल्याने ते बुजविण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासाव्या लागतात. परंतु, या बाबी देखील तपासल्या नसल्याचे महापालिकेनेच तलावाच्या ठिकाणी उभारलेल्या मार्केट आणि प्रभाग समिती कार्यालयकडे पाहून निर्दशनास येते. मुंब्य्रातील तलाव बचावला...मुंब्रा भागात २.१० हेक्टर जागेवर असलेला तलाव बुजवून त्या ठिकाणी संक्रमण शिबिर उभारण्याचा घाट पालिकेने घातला होता. या संदर्भातील प्रस्तावही महासभेत मंजूर झाला होता. परंतु, काही दक्ष ठाणेकरांनी या संदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करुन हा प्रयत्न हाणून पाडला. तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, ६५ पैकी शहरात ३५ तलाव शिल्लक असून उर्वरित तलावांचे काय झाले. हा सर्वसामान्य ठाणेकर म्हणून पडत आहे. केवळ पालिकेकडे दूरदृष्टी नसल्यानेच तलावांची आज ही अवस्था झाली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पालिका प्रशासनाच आहे. - नितिन देशपांडे - दक्ष नागरीक पालिकेच्या दप्तरी सध्या ३५ तलावांचीच माहिती उपलब्ध आहे. परंतु, पूर्वीच्या तलावांची माहिती शोधावी लागेल. या विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडूनच ही माहिती उपलब्ध होऊ शकेल. - संजय हेरवाडे - उप आयुक्त, स्थावर मालमत्ता
महापालिकेलाच नाही ३० तलावांचा थांगपत्ता
By admin | Published: November 04, 2015 12:34 AM