ठाणे- महापालिका हद्दीतील हॉटेल्स आणि बारच्या विरोधात पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रुड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी उभारलेले अनधिकृत मंडप, रूफ टॉप पालिकेने जमीनदोस्त केलेत. दादलानी रोड येथील हवेली हुक्का पार्लर तोडण्यात आले आहेत. तर जयेश बार व माजिवडा ब्रिजजवळील तृप्ती, शॉकसह ३९ हुक्का पार्लर सील करण्यात आले आहेत. हिरानंदानी येथील मेडोज व बार इंडेक्स यांचे फर्निचर महापालिकेने जप्त केले आहे.शहरात थर्टी फर्स्ट'च्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना टेरेसवर उभारण्यात आलेले बार , हुक्का पार्लरवर महापालिकेच्या वतीनं तोडक कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपुल्ले आणि अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे, सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली आहे.शहरात अग्ग्निसुरक्षतेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची हेळसांड केली जाणार नसून दोषींविरोधात पालिकेच्या वतीने कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रभाग समिती स्तरावर अधिकाऱ्यांची पथके तयार केली असून, शहरातील अग्ग्निसुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. शहराच्या अग्निसुरक्षेतेसाठी पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
ठाण्यातील रूफ टॉपवर महापालिकेचा हातोडा, ३९ हुक्का पार्लर केले सील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 6:31 PM