नामदेव मोरे नवी मुंबई : एनएमएमटीने २००१ मध्ये एमआयडीसीकडून महापेमध्ये बसडेपो घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपोचा १६ वर्षांमध्ये योग्य वापर प्रशासनाला करता आलेला नाही. जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला हा डेपो धूळ खात पडून आहे. डेपोला लागून व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून महापालिका परिवहन उपक्रमाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील काही वर्षांमध्ये बसेसची स्वच्छता व फेºयांमध्ये सुधारणा झाली असली तरी त्याचा उत्पन्नवाढीवर फारसा उपयोग झालेला नाही. तिकिटांपेक्षा इतर स्रोत वाढविण्याकडे प्रशासनाने फारसे लक्ष दिलेले नाही. शहरातील डेपोचा योग्यपद्धतीने वापर केला जात नसून त्यामध्ये महापे बसडेपोचा समावेश आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये २ लाखपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. कामगारांसाठी वाहतुकीची फारशी साधने नाहीत. यामुळे एनएमएमटी, केडीएमटीच्या बसेसच्या माध्यमातून कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. एमआयडीसी परिसरामध्ये मध्यवर्ती डेपो असावा यासाठी पालिका प्रशासनाने पाठपुरावा करून महापे पोलीस चौकीजवळ विस्तीर्ण भूखंड एमआयडीसीकडून मिळविला आहे.भूखंडावर प्रशासकीय कामासाठी दोन मजली इमारत उभारण्यात आली असून भूखंडाच्या दुसºया टोकावरही एका वास्तूचे बांधकाम केले आहे. भूखंडावर निवारा शेडही उभारले असून यासाठी लाखोंचा खर्च केला आहे. काही दिवस येथे बसेस थांबविल्या जात होत्या, पण नंतर डेपोचा वापर पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.महापे डेपोमध्ये २००८ च्या दरम्यान घंटागाडीच्या ठेकेदाराने गॅरेज सुरू केले होते. कचरा वाहतूक करणारी वाहने डेपोत उभी करण्यात येत होती. त्यांची दुरूस्तीसाठी कंटेनर केबिनमध्ये गॅरेज सुरू केले होते. यानंतर बाजूच्या गॅरेज चालकांनीही त्यांच्याकडे दुरूस्तीसाठी आलेली वाहने तेथे उभी करण्यास सुरवात केली होती. प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर डेपोतील अतिक्रमण थांबविण्यात आले असून तेथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे. पण सद्यस्थितीमध्ये डेपोतील इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे.महापे डेपोची अवस्था अत्यंत बिकट आहे. एमआयडीसीमधील या डेपोचा योग्य वापर करण्यात यावा यासाठी परिवहन समितीच्या बैठकीमध्ये आवाज उठविला जाईल. अशाप्रकारे कोणतीही मालमत्ता धूळ खात पडता कामा नये अशी आग्रही भूमिका आम्ही मांडणार असून वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.- समीर बागवान,परिवहन सदस्य,शिवसेना
एनएमएमटीचा ५० कोटींचा डेपो धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:45 AM