डोंबिवली : शहरातील एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे झालेल्या वायू प्रदूषणामुळेडोंबिवलीकरांची झोप उडाली होती. प्रदूषण नियंत्रण महामंडळावर त्यांनी कडाडून टीका केली. त्यामुळे दुर्गंधी कुठून आली, कुठे गॅस गळती झाली का? याची पाहणी कारखानदारांच्या कामा संघटना व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी एमआयडीसी परिसरात सर्वत्र केली. परंतु, त्यांना दोष सापडला नाही. त्यामुळे वायू प्रदूषण अन्य ठिकाणी झाले असावे व वाºयामुळे येथे त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवला असावा, अशी शक्यता असल्याचा दावा ‘कामा’चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत आम्ही बुधवारी रात्री उशिरापर्यंत आणि गुरुवारी सकाळी व दुपारी काही वेळ ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली येथील नाले, एमआयडीसीच्या कंपन्या, तसेच जेथून नाल्याद्वारे पाणी सोडले जाते अशा सर्व ठिकाणी पाहणी केली. पण आम्हाला कुठेही दुर्गंधी, उग्र दर्प वा घाण आढळून आली नाही, असे सोनी यांनी सांगितले. तर, बुधवारच्या घटनेपासून आम्ही टप्याटप्प्याने सर्वत्र पाहणी करत आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाचे अधिकारी संजय भोसले यांनी सांगितले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याच एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, समुद्र असो किंवा खाडीच्या पाण्यात भरती-आहोटी ही प्रक्रिया सतत सुरूच असते. त्यात डोंबिवलीच्या खाडीमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, तसेच कल्याण आदी भागातून सर्वच प्रकारचे पाणी येत असते. जेव्हा एमआयडीसीतील कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर जे खाडीत सोडण्यात येते, त्या पाण्यातील काही भाग ओहोटीच्या वेळी त्या गाळामध्ये अडकतो. त्यामुळे त्या गाळाचा जेव्हा थंडी, ऊन अशा वातावरणातील बदलांशी संपर्क येतो त्यावेळी त्यातून दुर्गंधी अथवा गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. विशेषत: थंडीच्या दिवसांमध्ये असा उग्र दर्प येण्याची दाट शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. तसाच काहीसा प्रकार बुधवारच्या घटनेत झाला असावा, त्यामुळेच कधी नव्हे तो ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गाने जाणाºया प्रवाशांनाही त्याचा त्रास झाल्याचा दावाही मंडळाकडून करण्यात आला.
रसायनमिश्रित पाणी थेट उघड्या नाल्यात
कल्याण-शीळ रस्त्यावरील सुयोग हॉटेल ते नंदी पॅलेसदरम्यानच्या गटारात एमआयडीसीमधील कंपन्यांमधून गुरुवारीही रसायनमिश्रित काळे पाणी सर्रासपणे उघड्या नाल्यात वाहत होते.
एमआयडीसीतील रहिवासी, दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्रपणे पाहणी केली असता त्यांच्यात ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर नागरिकांना सतर्क केले.ते म्हणाले की, निळे, काळे रसायनमिश्रित पाणी गटारात सोडण्यात आले होते. त्यामुळे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी उघड्यावर सोडू नये, असा नियम असतानाही तो सर्रास धाब्यावर बसवला गेल्याने कंपनीचालकांवर प्रदूषण मंडळाचा वचक नाही हे स्पष्ट झाले. दरम्यान, हे फोटो संबंधित अधिकाºयांनाही पाठवले आहेत.