उल्हासनगर : जनमताचा आदर ठेवत महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्प्यात अभय योजना लागू केली. मात्र त्यानंतर थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाहीतर, माफी नसल्याचे संकेत आयुक्तानी दिले आहे.
उल्हासनगर महापालिका उत्पन्न वाढविण्यासाठी तत्कालीन आयुक्तानी मालमत्ता कर विभागासाठी एकाच वर्षात दोन वेळा अभय योजना लागू केली. मात्र जानेवारी महिना अखेर विभागाची वसुली ७५ कोटी पेक्षा जास्त झाली नाही. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता थकबाकीची रक्कम ६०० कोटी पेक्षा जास्त दिसली. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने दंडूका उगारताच राजकीय नेत्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विभागासाठी अभय योजनेची मागणी लावून धरली. या मागणीसाठी आमदार कुमार आयलानी व पप्पू कलानी समर्थक आग्रही होते.
अखेर... आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. अभय योजनेचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान आहे. मालमत्ता कर थकबाकीसह चालू रक्कमेची रक्कम ऐककलमी भरणा केल्यास, १०० टक्के विलंबशास्ती माफ केली जाणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च दरम्यान असणार असून थकबाकीसह रक्कमेची एककलमी रक्कम व २५ टक्के विलंब शुल्क भरल्यास ७५ टक्के विलंबशुल्क माफ होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मालमत्ता कर थकबाकी रक्कमेसह एकरक्कमी व ५० टक्के विलंबशुल्क रक्कम भरल्यास थकबाकी वरील ५० टक्के विलंबशुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेनंतरही थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाही. तर त्यांच्यावर कारवाईचे संकेत आयुक्त आव्हाळे यांनी दिले.