भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत.तालुक्यात पाच व सहा तारखेला आलेल्या महापुरात भातसई गाव भातसा नदीच्या रौद्र रूपाने व्यापला होता. तालुक्याचे भाजप अध्यक्ष भास्कर जाधव तहसीलदार व आदिवासी विकासाचे संजय मीना यांच्या संपर्कात होते. ध्येय एकच होते भातसई येथील आश्रमशाळेतील मुलांना कोणत्याही परिस्थिती सुरक्षितबाहेर काढणे. पण रस्ताच नसल्याने जायचे कसे हा मोठा प्रश्न समोर असताना ठाणे येथील प्रकल्प अधिकारी शशिकांत पाटील, शहापूराचे सहायक प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर व वेहळोली गावचे सुपुत्र बाळू वेखंडे जे शहापूर येथील म.ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अशोक वेखंडे,परेश भोईर यांना ही बातमी समजताच त्यांनी जीवाची पर्वा न करता या मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा संकल्प केला.मोठे ओढे, नाले पार करत ही मंडळी कशीबशी शाळेजवळ पोहचली आणि चार ते पाच फूट पाण्याखाली गेलेल्या शाळेतून साडेतीनशे मुलांना पाण्याबाहेर सुरक्षितस्थळी आणण्याची कामिगरी या टीमने चोख बजावली. आदिवासी विभागाने या कामिगरीबद्दल शशिकांत पाटील, विजय भडगावकर यांना आदिवासी दिनी विशेष पुरस्कार देऊन गौरवले. मात्र वेहळोलीचे हे सुपुत्र मात्र अशा गौरवापासून दूरच राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 2:03 AM