स्नेहा पावसकरठाणे : मराठी मालिकांमधील मुख्य स्त्री भूमिकांवरून सुजय डहाकेंनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत असताना ठाण्यातील अभिनेत्री, निर्माते, कलाकार यांनीही निषेध केला आहे. सिनेसृष्टीत काम हे जातधर्म पाहून नाही तर टॅलेंटच्या जोरावरच मिळते. मुळात जातीयवादात पडायचेच का? माणसाला माणूस म्हणून पाहा आणि जातीयवाद मराठी सिनेसृष्टीत तरी कधी केला जात नाही आणि हीच मराठी सिनेसृष्टीची खासियत आहे, अशा शब्दात सर्वांनी त्याचा समाचार घेतला आहे.
मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत फक्त ब्राम्हण अभिनेत्री दिसतात, इतर जातीच्या मुली का दिसत नाहीत, असा प्रश्न दिग्दर्शक सुजय डहाके यांनी अलीकडेच केला होता. त्यावर अनेक मराठी कलाकारांनी फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियातून मत व्यक्त करत त्याचा निषेध केला. ठाण्यातीलही अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी सुजय यांचे हे वक्तव्यच चुकीचे आहे, मुळात अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य करण्याची त्यांना काहीच गरज नव्हती, असे म्हटले आहे. त्याच्या वक्तव्यावर कोणतेही मत देणे म्हणजे त्याला मोठे करण्यासारखे होईल. त्याला मोठे व्हायचे असेल तर त्याने अशी वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा काम करून मोठे व्हावे, असाही टोला काही जणांनी मारला.मराठी किंवा हिंदी सिनेसृष्टीत जात पाहिलीच जात नाही. जातीयवादात पडायचेच का, हेच कळत नाही. आपण भारतीय आहोत, हीच ओळख मोठी आहे. मी कोणत्या जातीची आहे म्हणून मी चांगला अभिनय करते, असे होत नाही. अभिनय हा कलागुणांमुळे होतो आणि त्याच आधारे भूमिका मिळत असतात. त्यामुळे हे वक्तव्यच चुकीचे आहे. त्याच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती.- तेजश्री प्रधान, अभिनेत्रीहे वक्तव्यच मुळात न पटण्यासारखे आहे. कारण सिनेसृष्टीत काम अर्थात भूमिका या जात नव्हे तर टॅलेंट पाहून दिल्या जातात. जर त्याच्या वक्तव्यात तथ्य असते तर आज सिनेसृष्टीत अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी सगळीकडे ठरावीक जातीची मंडळी दिसली असती. मात्र, असा जातीचा भेदभाव इथे कधीच केला जात नाही. - सुरुची आडारकर, अभिनेत्रीसुजयचे वक्तव्य निरर्थक आहे. आज सिनेसृष्टीत सर्वच जातीधर्माचे लोक विविध कामे करतात. असा जातीधर्माचा उल्लेखही इथे होत नाही. जर असे असते तर दिग्दर्शक, निर्मातेही ब्राम्हणच निवडले गेले असते; पण असे मराठी सिनेसृष्टीत होत नाही आणि हेच या सृष्टीचे वैशिष्ट्य आहे. त्याचे हे वक्तव्य ऐकता त्याला मानसिक उपचारांची गरज आहे, असे वाटते. - विजू माने, निर्माता