ठाणे : लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशीही पालिकेच्या अनेक केंद्रांवर गोंधळ दिसून आला. पोस्ट कोविड सेंटर, बाळकुम येथील कोविड सेंटर, मनोरमानगर, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील केंद्रासह इतर केंद्रांवर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या नसणे, वारंवार सर्व्हर डाउन होणे, पिण्यास पाणी उपलब्ध नसणे, असा सावळागोंधळ होता. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी लसीकरणाकरिता आलेल्या ज्येष्ठांना त्रासाला सामोरे जावे लागले.
ठाणे महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेने शहरातील १५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी या केंद्रांवर सुमारे एक हजारांच्या आसपास ज्येष्ठांचे लसीकरण झाले. तिसऱ्या दिवशीदेखील अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह दुसरा डोस घेणाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोस्ट कोविड सेंटर येथे वेळेआधीच ज्येष्ठांनी रांग लावली होती. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. त्यामुळे ते ताटकळल्याचे दिसून आले. अर्ध्या तासानंतर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व्हर वरचेवर डाउन झाल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती दादोजी कोंडदेव येथील केंद्रावर होती. तेथेही ज्येष्ठांना नाना समस्यांना सामोरे जावे लागले. बसण्यासाठी खुर्च्या नसणे, उन्हाच्या झळांचा त्रास सुरू झालेला असताना पिण्यास स्वच्छ पाणी नसणे, या समस्यांमुळे ज्येष्ठांनी तीव्र नाराजी प्रकट केली. या संदर्भात जगदीश खैरालिया यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्यावर खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली. मनोरमानगर केंद्रावर सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व्हर डाउन असल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला. ॲप वारंवार डाउन होत असल्याने आपला नंबर केव्हा लागणार, अशी विचारणा ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती.
........
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी ४५ ते ६० वयोगटांतील १३१ आणि ६० पुढील ९२८ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील १५ केंद्रांवर गर्दी झाल्याचे चित्र होते.
............
वाचली