ठाणे : पावसाळ्यापासून घोडबंदर मार्गावरून प्रवास करणे ठाणेकरांसाठी मोठे दिव्य आहे. घोडबंदरवरून प्रवास करणे म्हणजे खराब रस्त्यामुळे दोन तास वाहतूक कोंडीला सामोरे जाणे नित्याचे बनले आहे. कापूरबावडी ते फाऊंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता सर्वाधिक खराब झाला आहे. या संपूर्ण मार्गापैकी काही मार्ग महापालिका तर काही सार्वजनिक बांधकाम, काही मेट्रो प्रकल्प, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, तर काही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे यांच्यातच समन्वय नसल्यामुळे रस्ता दुरूस्ती केवळ तात्पुरती केली जात आहे. या मार्गावर दोनशेहून अधिक खड्डे असून दररोज खड्डे बुजविण्याचे काम केले जात असले तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी होण्यास काहीच मदत होत नसल्याचे समोर येत आहे.
प्रशासनाने लवकरच ह्या मार्गावरील रस्ते दुरूस्ती करून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी अभियंतांना निवेदनाद्वारे केली आहे.
घोडबंदरचा मार्ग हा पूर्वी एमएसआरडीसी(मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) च्या अंतर्गत येत होता. या रस्त्याची सर्व जबाबदारी ही त्यांची होती. पण मार्च २०२१ ला कापूरबावडी ते फाऊंटन हॉटेल पर्यं चा रस्ता एमएसआरडीसीने पीडब्ल्युडी(सार्वजनिक बांधकाम विभाग) यांना हस्तांतरित केला. तर फाऊंटन हॉटेल येथील मिरा भाईंदर महापालिकडे असलेला सर्व्हिस रस्ता देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला ऑक्टोबर २०२१ ला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वाधिक मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असूनही खड्डे बुजविण्यासाठी या विभागाने साधी निविदा देखली अद्याप काढलेली नाही. केवळ देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली या मार्गावर तात्पुरती उपाय-योजना केली जात असून यासाठी कोणताही निधी देखील मंजूर करण्यात आलेला नसल्याचे या विभागाचे ज्येष्ठ अभियंता सुरेश परदेशी यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्राधिकरण यांना पावसाच्याआधी सर्वच खड्डे बुजवण्याबाबत पत्र देऊन सुद्धा गेल्या चार -पाच महिन्यात काम झाले नसल्याचे समोर येत आहे.
अजूनही पेवर ब्लॉकचा वापर -यापूर्वीच न्यालयाने खड्डे बुजविण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर करू नये, असे स्पष्ट आदेश देऊनही आजही ठाणे शहरात खड्डे बुजविण्यासाठी पेवर ब्लॉक वापरत असल्याचे समोर आले. यावर विचारणा केली असता, मोठे खड्डे बुजविण्यासाठी पेवर ब्लॉकच कामी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.